वणीकरांच्या सेवेत लवकरच येत आहे आणखी एक सहकारी पतसंस्था


सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : सहकार क्षेत्रात विशेष प्रगती साधलेल्या वणी तालुक्यात सहकारी पतसंस्थांचं जाळं विणलं गेलं असून पतसंस्थांची यशस्वी वाटचाल सुरु आहे. पतसंस्थांची आर्थिक सूत्रबद्धता व नागरिकांचा पतसंस्थांकडे झुकत असलेला कल बघता सहकारी पतसंस्थांचं भविष्य उज्वल असल्याचं सध्या तरी पाहायला मिळत आहे. सहकारी पतसंस्था जनतेच्या विश्वासास पात्र ठरल्याने पतसंस्थांमध्ये आर्थिक गुंतवणूक करणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. अनेक वर्षांपासून सहकार क्षेत्राने आपली विश्वासाहर्ता टिकवून ठेवली. या सहकार क्षेत्रात आणखी एका पतसंस्थेचं आगमन होत असून ही सहकारी पतसंस्था लवकरच वणीकर जनतेच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने नुकतीच या पतसंस्थेला मान्यता दिली आहे. श्री लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. वणी असे या वणी तालुक्यात नव्याने सुरु होत असलेल्या पतसंस्थेचे नाव आहे. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या संकल्पनेतून ही पतसंस्था साकार झाली असून या पतसंस्थेच्या अध्यक्षा त्यांच्या सुनबाई मीनाक्षी सुनील देरकर या आहेत. लवकरच तालुक्यातील जनतेला या बँकेच्या विविध सेवांचा लाभ घेता येणार आहे. तसेच यवतमाळ जिल्यातील अन्य तालुक्यांमध्येही या पतसंस्थेच्या शाखा निर्माण करण्याचा या पतसंस्थेच्या अध्यक्षीय मंडळाचा मानस आहे. 
महिला बचत गटांना प्रथम प्राधान्य देऊन महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यावर या पतसंस्थेच्या माध्यमातून भर दिला जाणार असल्याचे पतसंस्थेच्या अध्यक्षा मिनाक्षी देरकर यांनी सांगितले आहे. महिला आर्थिकदृष्ट्या बळकट व्हाव्या, याकरिता बचतगटांच्या माध्यमातून विविध योजनांचा महिलांना लाभ मिळवून देण्याचाही ही पतसंस्था प्रयत्न करणार आहे. या पतसंस्थेच्या अध्यक्षीय मंडळामध्ये अध्यक्षा मिनाक्षी सुनिल देरकर यांच्यासह सुनिता संजय देठे, छबू महेश आसुटकर, ममता नेताजी पारखी, पल्लवी प्रफुल बोढाले, शारदा शिवाजी चिंतकुटलवार, शालिनी प्रसाद ठाकरे, संचिता विजय नगराळे, सुरेखा कवडू ढेंगळे, मंगला महेंद्र मुथा, भारती मनिष बतरा यांचा समावेश आहे. या संस्थेला मान्यता मिळवून देण्याकरिता जिल्हा उपनिबंधक रमेश एन. कटके, जिल्हा कार्यालय अधिक्षक राजेश गुज्जर, प्रथम श्रेणी सहकारी अधिकारी सचिन कुळमेथे, द्वितीय श्रेणी अधिकारी मनोज भगत, यवतमाळ मजदूर संघाचे अध्यक्ष विलास महाजन, यांनी विशेष सहकार्य केले.
वणीकरांच्या सेवेत लवकरच येत आहे आणखी एक सहकारी पतसंस्था वणीकरांच्या सेवेत लवकरच येत आहे आणखी एक सहकारी पतसंस्था Reviewed by सह्याद्री चौफेर on December 25, 2021 Rating: 5
Powered by Blogger.