सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : बँड बाजाच्या आवाजामुळे शिकवणंच थांबवावं लागत असल्याची व्यथा येथील एका मॅरेज हॉल व लॉन समोर असलेल्या शाळेची झाली आहे. वणी वरोरा मार्गावरून विठ्ठलवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर लॉन व शाळा अगदीच समोरासमोर असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर लॉनमधील कल्लोळाचा चांगलाच परिणाम होतांना दिसत आहे. या लॉन मध्ये मोठ्या प्रमाणात लग्न सोहळे होत असून लग्न वरात लॉन जवळ आल्यानंतर तासंतास बँडबाजा वाजविला जात असल्याने शाळेतील शिक्षकांना शिकवणीवर्गच बंद करावे लागत आहे. तसेच बँडबाजा बंद होई पर्यंत विद्यार्थ्यांसह वर्गाबाहेर थांबावे लागत असल्याने मुलांच्या शिक्षणावर चांगलाच परिणाम होतांना दिसत आहे. कधी कधी तर लॉनमधून लग्नवरात काढली जात असल्याने लॉन जवळच तासंतास बँडबाजा वाजत रहातो. त्यामुळे मोठा आवाज निनादत असल्याने शिक्षकांना शिकवणंच थांबवावं लागतं. परिणामी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याची खंत शिक्षकांमधून व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे लॉन मध्ये होणाऱ्या लग्न सोहळ्यांकरिता येणारी वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्यामुळे विठ्ठलवाडी परिसरातील नागरिकही कमालीचे संतापले आहेत. वाहनांबरोबरच लग्नवरातीनेही संपूर्ण रस्ता वेढला जात असल्याने या परिसरातील नागरिकांचे जाणे येणेच कठीण होऊन बसते. त्यामुळे घर परिसराकडे जाणाऱ्या नागरिकांचा चांगलाच मनःस्ताप होतांना दिसत आहे. लॉन मालकाने केलेली पार्किंगची सुविधा तोडकी असल्याने व नियोजनाचा अभाव असल्याने आता सर्वांनाच या लॉनचा त्रास होऊ लागला आहे. समोर शाळा असतांना दिवसाला तासंतास लॉन जवळ बँडबाजा वाजविला जातो. पण लॉन मालक जराही हरकत घेतांना दिसत नाही. मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असतांना संबंधित विभागही याची दखल घ्यायला तयार नाही. वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्याने रहदारीला अडथळे निर्माण होत असतांनाही नगर पालिका प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. लॉन व्यवस्थापनाच्या योग्य नियोजनाअभावी विद्यार्थी व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून नगर पालिका प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्यास नाईलाजास्तव नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागणार असल्याच्या प्रतिक्रिया परिसरातून ऐकायला मिळत आहे. लॉनमध्ये होणाऱ्या लग्न सोहळ्यांमुळे कुणालाही त्रास होणार नाही याची लॉन मालकाने दक्षता घेण्याची मागणी विठ्ठलवाडी व गौरकार कॉलनी येथील नागरिकांमधून होत आहे. तसेच लॉन जवळ तासंतास बँडबाजा वाजविल्या जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खोळंबा होत आहे. तेंव्हा दिवसाला लॉन जवळ बँडबाजा वाजविण्याला प्रतिबंध लावण्याची मागणीही येथील नागरिकांनी केली आहे.