टॉप बातम्या

चित्रनगरीत मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मुंबई : महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चित्रनगरीमार्फत मराठीतील उत्कृष्ट चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी करण्याचे नियोजन असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

आज मंत्रालयात फिल्मसिटी संदर्भातील आढावा बैठक‍ आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गोरेगाव चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे, व्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे, अजय सक्सेना, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, आदी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये मराठीमध्ये आशयघन चित्रपट आलेले आहेत. या चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने हे सिनेमे पाहण्याची संधी प्रेक्षकांना फिल्मसिटीमार्फत उपलब्ध होणार आहे. लोककलावंताचे वार्षिक संमेलन, महाराष्ट्र महोत्सव, मराठी चित्रपट पुरस्कार, लोकोत्सव असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि फिल्मसिटी पुढाकार घेणार आहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथे दरवर्षी एका विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आणि कलाकार कल्याण मंडळ स्थापन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने पुढाकार घ्यावा. याशिवाय राज्यातील वेगवेगळ‌या कला क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांची माहिती एका ठिकाणी मिळावी यासाठी पोर्टल तयार करण्यात यावे असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
Previous Post Next Post