सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी : भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांचं तामिळनाडूच्या कुन्नूर परिसरात हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी निधन झालं. हेलिकॉप्टर मध्ये जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत व अन्य काही जण प्रवास करीत होते. या अपघातात एकूण १३ जणांचं दुर्दैवी निधन झालं. अपघाती मृत्यू ओढवलेल्या जनरल बिपीन रावत यांच्यासह १३ जणांना श्रद्धांजली वाहण्याकरीता शिक्षक मित्र परिवार प.स. वणी, उड्डाण करियर अकॅडमी वणी व आय कॅन करियर अकॅडमी वणी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित असलेले वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, ठाणेदार श्याम सोनटक्के व मनसेचे राजू उंबरकर यांनी जनरल बिपीन रावत यांचे स्मरण करून त्यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच मान्यवरांनी त्याच्या शौर्य गाथेवर प्रकाश टाकत शोकसंवेदना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या यशस्वतेकरिता अकॅडमीचे राजेंद्र साखरकर, महेश लिपटे, राजेश पहापळे, सोपान लाड, गणेश असुटकर, व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.