स्त्री सुरक्षा ही समाजाची जबाबदारी - डॉ. संध्या पवार


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : "सामाजिक जडणघडणीचा आधारस्तंभ असणाऱ्या स्त्रीच्या बाबतीत समाजाने तिला सुरक्षितता प्रदान करणे, तिच्या भावनांना योग्य क्षितिज प्रदान करणे, तिच्यातील कलागुणांना सुयोग्य संधी उपलब्ध करून देणे आणि तिच्या आत्मसन्मानाचा सुयोग्य आब राखणे ही समाजाची जबाबदारी आहे.

मुलींनी स्त्रियांनी देखील आपल्या संरक्षणासाठी आवश्यक असणारे कायदे जाणून घेऊन त्याचप्रमाणे स्वतःच्या हक्कासाठी जागृत राहात आत्मसंरक्षणाचे धडे गिरवले पाहिजे. स्त्री सुरक्षित आणि सुशिक्षित असेल तरच समाज संपन्न समजला जातो. अशा समाजाच्या निर्मितीसाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा" असे मत सुप्रसिद्ध समाजसेविका, पालक मैत्री अभियानाच्या संयोजिका डॉ. संध्या पवार यांनी व्यक्त केले.

लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या लैंगिक छळ तक्रार निवारण समिती आणि इतिहास विभागाच्या वतीने आयोजित स्त्रियांची सुरक्षितता सामाजिक जबाबदारी या विषयावर त्या आपले मत व्यक्त करीत होत्या.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अशोक सोनटक्के उपस्थित होते.
आभासी पद्धतीने झालेल्या या व्याख्यानाची प्रस्तावना करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी समाजामध्ये स्त्रीयांसाठी तक्रार पेटी लावावी लागते ही खरोखरच दुर्दैवी गोष्ट आहे असे म्हणत या विषयाचे गांभीर्य स्पष्ट केले.

 आपल्या ओघवत्या, अभ्यासपूर्ण आणि तळमळ युक्त संवादामध्ये डॉ. पवार यांनी स्त्रीच्या हक्काचा सोबतच तिच्या कर्तव्याचा, तिच्या संस्कार संपन्न तिचा विषय देखील प्राधान्याने प्रस्तुत केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखणारी सजगता विद्यार्थीनींनी मध्ये कायम असायला हवी असे सांगत चांगल्या साठी चांगले पण वाईट यासाठी वाईट व्हायला हवे असा मोलाचा संदेश त्यांनी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना दिला.
    अध्यक्षीय मनोगतामध्ये स्त्रीला दिला जाणार या आदराचा आरंभ आपल्या घरातून व्हायला हवा. समोरच्या व्यक्तीकडे माता-भगीनीच्या नजरेने पाहायला आपली संस्कृती शिकवते असे विचार अशोक सोनटक्के यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख डॉ.रेखा बडोदेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. होमराज पटेलपैक यांनी केले. किरण वांढरे यांनी वणीच्या सुकन्या असणाऱ्या वक्त्यांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. परेश पटेल, पंकज सोनटक्के, आनंद बनसोड, मनीष पारखी, सुवर्णा बुऱ्हाण, प्रशांत पाठक, यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्त्री सुरक्षा ही समाजाची जबाबदारी - डॉ. संध्या पवार स्त्री सुरक्षा ही समाजाची जबाबदारी - डॉ. संध्या पवार Reviewed by सह्याद्री चौफेर on December 17, 2021 Rating: 5
Powered by Blogger.