वणी तालुक्यात ओव्हरलोड वाहतुकीला उधाण, बिनधास्त सुरु आहे ओव्हरलोड वाहतूक !

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वणी येथून सर्रास ओव्हरलोड वाहतूक सुरू असून क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या वाहतुकीमुळे नव्याने बांधलेले रस्तेही उखडू लागले आहेत. तालुक्यातील वांजरी व गौराळा येथिल लाइमस्टोनच्या खदानींमधून मुकुटबन येथिल बिर्ला सिमेंट कंपनीत ओव्हरलोड लाइमस्टोनची वाहतूक सुरु असतांनाही आरटीओ विभागाचे याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. शहरातील वाहतूक विभागही आरटीओ विभागाकडे बोट दाखवून ओव्हरलोड वाहनांवर कार्यवाही करण्यास असमर्थता दर्शवित आहे. वणी मुकुटबन हा नव्यानेच तयार करण्यात आलेला रस्ता ओव्हरलोड वाहतुकीमुळे उखडू लागला आहे. वणी वरून मुकुटबन सिमेंट कंपनी व अडेगाव वरून राजूर चुना कारखान्यांमध्ये ओव्हरलोड वाहतूक सुरु असून क्षमतेपेक्षा अती जास्त वजन नेणाऱ्या वाहनांवर आरटीओ विभागाने धडक कार्यवाही करणेच बंद केल्याने वाहतूकदार निर्धास्त झाले आहेत. परिणामी नव्यानेच डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते अल्पावधीतच उखडू लागले आहेत.

काही महिन्याआधी प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी ओव्हरलोड वाहनांची शोध मोहीम राबवून पासिंग क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कार्यवाही करायचे. त्यामुळे ओव्हरलोड वाहतुकीवर रोख लागली होती. वाहतूकदारही आरटीओच्या कार्यवाहीच्या धास्तीने ओव्हरलोड वाहतूक करतांना घाबरायचे. पण मागील काही महिन्यांपासून आरटीओचे ओव्हरलोड वाहतुकीकडे दुर्लक्ष झाले आहे. ओव्हरलोड वाहनांवरील कार्यवाहीच थंडबस्त्यात आली आहे. चिखलगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ वाहतूक पोलिसांचा पहारा असतो. तेथूनच ही ओव्हरलोड वाहने बिनधास्त वाहतूक करतात. पण वाहतूक पोलिस वाहनधारकांजवळ कांटा पर्ची व रॉयल्टी असल्याने आम्ही कार्यवाही करू शकत नसल्याचे सांगतात. या वाहनांवर कार्यवाही करण्याचे अधिकार आरटीओलाच असल्याचे सांगत आपले अंग काढून घेतात. प्रत्येक हप्त्याला वणी येथे आरटीओचा कॅम्प असतो. आधी कॅम्पमध्ये येणारे आरटीओ ओव्हरलोड वाहतूक होणाऱ्या मार्गावर गस्त घालून ओव्हरलोड वाहनांवर धडक कार्यवाही करायचे. पण आता ओव्हरलोड वाहनांवर तशी कार्यवाही होतांना दिसत नाही. पूर्वी कुणालाही सुगावा न लागू देता आरटीओ वणीला यायचे व पासिंग क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांची धरपकड करायचे. या वाहनांवर धडक कार्यवाही करायचे. पण आता आरटीओ अधिकाऱ्यांनी रस्त्यांवर गस्त घालणेच बंद केल्याचे वाहतूदर चांगलेच निर्ढावले आहेत. पासिंग क्षमतेपेक्षा १० ते १५ टन अतिरिक्त वजनाची मालवाहतूक सर्रास केली जात आहे. सिमेंट उपयोगी असलेल्या लाईमस्टोनची वांजरी व गौराळा येथून मुकुटबन येथील बिर्ला सिमेंट कंपनीमध्ये वाहतूक केली जाते. पासिंग क्षमतेपेक्षा अतीजास्त वजनाचा माल ट्रकांमध्ये वाहून नेला जातो. कित्येक ट्रकांच्या लिफ़्टरची चाके उचललेली असतात. काही वाहनांच्या लिफ्टरला तर टायरच लावलेले नसल्याचे पाहायला मिळते. उघडपणे ओव्हरलोड वाहतूक सुरु असतांनाही आरटीओ विभाग याकडे लक्ष द्यायला तयार नाही, याचेच नवल वाटते. वार्षिक व मासिक हप्त्यांची जुनी परंपरा आजही चालूच आहे की काय, असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे. रस्त्यांची हालत खस्ता करणाऱ्या ओव्हरलोड वाहतूकीला आळा बसेल काय, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. ओव्हरलोड वाहनांवर आरटीओने धडक कार्यवाही करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. 

त्याचप्रमाणे शहर व तालुक्यात टॅक्स, इन्शुरन्स व फिटनेस ची मुद्दत संपलेली वाहनेही कोळसाखाणी व कंपन्यांमध्ये मालवाहतूक करतांना दिसत आहेत. स्कॅनिंग करून वाहनांच्या कागदपत्रांमध्ये हातचलाखीने तारखा वाढविल्या जात आहे. कम्पुटरमध्ये स्वतःच स्कॅनिंग करून वाहतूकदार टॅक्स, इन्शुरन्स व फिटनेसच्या तारखा वाढवत असल्याचे धक्कादायक प्रकारही तालुक्यात सुरु आहेत. कागदपत्रांच्या तारखा वाढवून वाहनांना मालवाहतुकी करिता कोळसाखानी व कंपन्यांमध्ये परवानगी मिळविण्यात येते. शासनाचा विविध प्रकारचा वाहन कर बुडवून वाहनांची वाहतूक सुरु आहे. फिटनेस संपलेली वाहनेही बिनधास्त रस्त्यांवर धावत आहे. याकडेही आरटीओ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
वणी तालुक्यात ओव्हरलोड वाहतुकीला उधाण, बिनधास्त सुरु आहे ओव्हरलोड वाहतूक ! वणी तालुक्यात ओव्हरलोड वाहतुकीला उधाण, बिनधास्त सुरु आहे ओव्हरलोड वाहतूक ! Reviewed by सह्याद्री चौफेर on December 30, 2021 Rating: 5
Powered by Blogger.