प्रदूषण कमी करण्यासाठी युद्ध स्तरावर काम करण्याची गरज - आ. किशोर जोरगेवार

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
         
चंद्रपूर : प्रदूषणामुळे चंद्रपूरकरांचे वयोमान 8 ते 10 वर्षाने कमी झाले आहे. येथील प्रदूषण दिवसागणिक धोक्याची पातळी ओलांडत आहे चंद्रपुरातील वायू प्रदूषण आटोक्यात यावे या दिशेने लोकप्रतिनिधी म्हणून माझे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. मात्र हे प्रदूषण कमी करण्यासाठी सामूहिकरीत्या युद्ध पातळीवर काम करण्याची गरज असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

इको-प्रो संस्थेच्या वतीने सावरकर चौक येथे कृत्रिम फुफ्फुस बोर्ड लावण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आज आमदार जोरगेवार यांनी सदरहु उपक्रमाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

इको-प्रो संस्थेच्या वतीने चंद्रपुरातील हवेचा दर्जा जाणून घेण्यासाठी कृत्रिम फुफ्फुस बोर्ड लावण्यात आले होते. यावेळी आठ ते दहा दिवसात हे कृत्रिम फुफ्फुस काळे झाले. त्यामुळे चंद्रपुरातील हवेतील प्रदूषणाची तिव्रता लक्षात आली आहे. ही चिंतेची बाब असून हे प्रदुषण कमी करण्याच्या उपाययोजना सुचविण्यासाठी सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेण्याचे आवाहन आ. जोरगेवार यांनी केले आहे. चंद्रपुरात कोळसा वाहतुकीनेही हवेतील प्रदूषणात वाढ झाल्याचे निकष समोर आले असून त्या दिशेनेही उपाययोजना करण्याची गरज आ. जोरगेवार यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर यांचीही उपस्थिती होती.

जिल्ह्यातील प्रदूषणावर खासदार धानोरकर यांचेही लक्ष असून ते जिल्ह्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आ. जोरगेवार यावेळी म्हणाले. तसेच इको-प्रो च्या या उपक्रमाचे आमदारांनी कौतुक केले. प्रदूषणामुळे मानवी शरीरातील अवयव प्रभावित होत आहे. याचा सर्वाधीक वाईट परिणाम फुफ्फुसावर होत असल्याचे इको-प्रो च्या या उपक्रमातून स्पष्ट झाले आहे. जिल्हाच्या चारही बाजूने वन आच्छादन असूनही चंद्रपूरकरांना शुद्ध हवेत श्वास घेणे शक्य होत नसने ही चिंतेसह चिंतणाचीही बाब असल्याचे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले.

इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे, कॉंग्रेस जिल्हा शहर कमेटी अध्यक्ष रामू तिवारी, यंग चांदा ब्रिगेडचे राशिद हूसेन, यांच्यासह इको-प्रो संस्थेच्या सदस्यांची मोठ्या संख्येने या वेळी उपस्थिती होती.
प्रदूषण कमी करण्यासाठी युद्ध स्तरावर काम करण्याची गरज - आ. किशोर जोरगेवार प्रदूषण कमी करण्यासाठी युद्ध स्तरावर काम करण्याची गरज - आ. किशोर जोरगेवार Reviewed by सह्याद्री चौफेर on November 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.