मनमानी दर आकारून केली जात आहे फटाक्यांची विक्री

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : दिवाळी म्हणजे फटाके फोडून आनंद साजरा करण्याचा उत्सव. निरनिराळ्या प्रकारचे फटाके खरेदी करून ते फोडले जातात. परिवारासोबत फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा केल्या जातो. लहानग्यांबरोबर मोठेही फटाके फोडण्याचा आनंद लुटतात. एक प्रकारे फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्याची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. परंतु आता फटाक्यांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांकरिता फटाके खरेदी करणेही आवाक्याबाहेरचे होऊ लागले आहे. वाढत्या किमतींमुळे फटाके खरेदी करणचं अवघड होऊ लागलं आहे. फटाक्यांची एमआरपी निश्चित नसल्याने फटका विक्रेते फटाक्यांचे मनमानी भाव आकारु लागले आहे. मनमर्जीने किमती लाऊन फटाक्यांची विक्री केल्या जात आहे. प्रत्येक ग्राहकांकडून फटाक्यांची वेगवेगळी किंमत घेतली जात आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच लूट होतांना दिसत आहे. फटाक्यांची दुकाने लावण्याकरिता दीपक चौपाटी परिसरात जागा देण्यात आली असली तरी काही दुकानदार लोकवस्तीत स्वतःच्या घरी फटाक्यांचे दुकान लाऊन नागरिकांचा जीव धोक्यात आणत आहेत. पोलिस स्टेशनच्या मागे बांधकाम विभागाच्या कार्यालया पासून काही अंतरावर एका किराणा दुकानदाराने लोकवस्तीत स्वतःच्या घरीच होलसेल फटाक्यांचे दुकान लावले. मंदिराच्या बाजूलाच फटाक्यांचे दुकान थाटण्यात आले. व फटाक्यांचे पैसे घेण्याची सेवा मंदिरात करण्यात आली. फटाके घेण्याकरिता या दुकानात झालेल्या गर्दीमुळे त्या परिसरातील नागरिकांचे जाणे येणे कठीण झाले. रस्त्यावर गाड्या उभ्या करून नागरिक फटाके घेऊ लागल्याने तेथील नागरिकांचा जाण्या येण्याचा मार्गच बंद झाल्याचे पाहायला मिळाले. रस्ता दुचाक्यांनी व्यापला गेल्याने नागरिकांना आपापल्या घराकडे जाणेही कठीण होऊन बसले होते. लोकांची निवासस्थाने असलेल्या ठिकाणी फटाक्यांचे दुकान लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत होते. लोकं रहात वस्तीत स्फोटक वस्तूंची विक्री करीत असतांना अनावधानाने अनुचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण. तसेच लोकवस्तीत बिनधास्तपणे थाटण्यात आलेले हे फटाक्यांचे दुकान दुर्लक्षित कसे, असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. संबंधित विभागाच्या डोळ्याआडून हे दुकान लावण्यात आले की, संबंधित विभागाची मूक संमती आहे, हेच कळायला मार्ग नाही. लोकांची निवासस्थाने असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची विक्री करण्यात येत असतांना संबंधित विभाग अनभिज्ञ कसा, हा प्रश्न देखिल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तेंव्हा भरमसाठ दर आकारून होणाऱ्या फटाक्यांच्या विक्रीवर अंकुश लाऊन लोकवस्तीत फटाक्यांची दुकाने न लावू देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
मनमानी दर आकारून केली जात आहे फटाक्यांची विक्री मनमानी दर आकारून केली जात आहे फटाक्यांची विक्री Reviewed by सह्याद्री चौफेर on November 07, 2021 Rating: 5
Powered by Blogger.