टॉप बातम्या

वाचन संस्कृती जीवंत राहणं काळाची गरज - विवेक पांडे


सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 

वणी : समाज माध्यमांच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. वाचनाची जागा दृकश्राव्य माध्यमांनी घेतली आहे. पण वाचनाने मन, बुद्धी एकाग्र होते. वाचनाने आपल्या संस्कृतीची ओळख निर्माण होते. दिवाळी अंकांच्या वाचनातून आपल्या संस्कृतीची एकत्रित ओळख होते. त्यामुळे वाचन संस्कृती जीवंत राहणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन येथील तहसीलदार विवेक पांडे यांनी केले आहे.
ते येथील नगर वाचनालयाद्वारे आयोजित दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. या प्रसंगी अध्यक्षस्थानी नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधवराव सरपटवार हे होते. 
      
दरवर्षी महाराष्ट्रातील दर्जेदार दिवाळी अंकांची खरेदी करून त्यांचे अवलोकन करण्यासाठी दिवाळी अंकांच्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते. त्यानंतर 200 रुपये या नाममात्र शुल्कात 40 ते 45 अंक वाचकांना वाचावयास मिळतात. दिवाळी अंक म्हणजे आपली बौद्धिक संस्कृती आहे. असे सांगून शहरातील वाचन प्रेमींनी या अंकांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष माधवराव सरपटवार यांनी केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. आभार संचालक हरिहर भागवत यांनी केले. या प्रसंगी प्रा. स्वानंद पुंड, प्रा. अभिजित अणे, विशाल झाडे अर्जुन उरकुडे, अनिल जयस्वाल, अशोक सोनटक्के इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार यांनी परिश्रम घेतले.
Previous Post Next Post