दीनदयालचे अध्यक्ष रमेश पांडे यांचे निधन

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
यवतमाळ : यवतमाळातील दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी यवतमाळ विभाग कार्यवाह रमेश चिंतामण पांडे यांचे लक्ष्मीपूजनाचे दिवशी, ४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.२२ वाजता नागपूर येथे दु:खद निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते.

पंजाब नॅशनल बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या रमेशजींना कर्करोग झाल्याचे सहा महिन्यांपूर्वी निदान झाल्यावर उपचार सुरू होते. यवतमाळ जिल्ह्यातील पिंप्री इजारा ता. महागाव हे मूळ गाव असलेल्या रमेशजींचा, सुरुवातीला विवेकानंद केंद्र व नंतर रा. स्व. संघाच्या बौद्धिक प्रमुख, नगर, जिल्हा, विभाग कार्यवाह अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांच्या मृदु स्वभावामुळे अफाट लोकसंग्रह होता. फेब्रुवारी २०२१ पासून त्यांच्यावर दीनदयालचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी आली होती. 
    
रमेशजींच्या पश्चात वयोवृद्ध आई सुमंगला, पत्नी पद्मा, पाटबंधारे विभागातील स्वेच्छानिवृत्त भाऊ नारायण, अजिंक्य व गौरी ही शिक्षण घेत असलेली दोन मुले, रेखा विनय गिरीधर, डाॅ. प्रणिता सुभाष वडोदकर, मीनल महेश पाठक या तीन विवाहित बहिणी आणि मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर नागपूरच्या मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याप्रसंगी झालेल्या सभेत रा. स्व. संघाचे प्रांत संघचालक राम हरकरे, सहकार्यवाह अतुल मोघे, किसान संघाचे प्रांत संघटनमंत्री रमेश मंडाळे, रवींद्र भुसारी, विद्या भारतीचे शैलेश जोशी, विहिंपचे अरुण नेटके, रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक प्रदीप वडनेरकर, विभाग कार्यवाह श्रीधर कोहरे, दीनदयालचे उपाध्यक्ष नरहर देव, सचिव विजय कद्रे, अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा, स्वदेशी जागरण मंचाचे अमोल पुसदकर, अभाविपचे विक्की कलाणे यांच्यासह सर्वांच्या वतीने नागपूर महानगर सहसंघचालक श्रीधर घाडगे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. रमेशजींच्या निधनाने देवदुर्लभ कार्यकर्ता हरविल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी दीनदयाल संचालक मंडळासह दूरवरून आलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
दीनदयालचे अध्यक्ष रमेश पांडे यांचे निधन दीनदयालचे अध्यक्ष रमेश पांडे यांचे निधन Reviewed by सह्याद्री चौफेर on November 05, 2021 Rating: 5
Powered by Blogger.