शिरपूर पोलिसांची दुहेरी कार्यवाही, एका तडीपाराला अटक तर दुसऱ्याला करणार तडीपार

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : तालुक्यातील नेरड (पुरड) येथील सराईत दारू विक्रेत्याला यवतमाळ जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले असतांनाही तो मूळ गावी परतल्याने त्याला शिरपूर पोलिसांनी राहत्या घरून ताब्यात घेतले. तसेच त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करित न्यायालयात हजर केले. त्याचप्रमाणे वेळाबाई या गावात छुप्या पद्धतीने अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपीलाही शिरपूर पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यालाही न्यायालयात हजर करण्यात आले असून दोन पेक्षा जास्त गुन्हे नोंद असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधक कार्यवाही करण्याकरिता शिरपूर पोलिसांकडून कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. लवकरच या गुन्हेगारांवर प्रभावीपणे प्रतिबंधक कार्यवाही करण्यात येणार आहे. 

सराईत दारू विक्रेता असलेला कवडू नामदेव टिकले (५०) या आरोपीला यवतमाळ जिल्ह्यातून तडीपार घोषित करण्यात आले होते. तो अवैध दारू विक्री करित असल्याने त्याच्यावर पुष्कळ गुन्हे दाखल आहेत. सराईत दारू विक्रेता म्हणून पोलिस दरबारी त्याची नोंद आहे. त्याच्यावर अवैध दारू विक्रीचे अनेक गुन्हे दाखल असल्याने शिरपूर पोलिसांनी त्याला जिल्हा बंदी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यावर प्रतिबंधक कार्यवाही करण्याकरिता शिरपूर पोलिस स्टेशनकडून कृती आराखडा तयार करून उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावावर निर्णय देतांना उपविभागीय दंडाधिकारी डॉ. शरद जावळे यांनी ३० सप्टेंबरला महाराष्ट्र पोलिस कायदा ५७(अ),(२) नुसार कवडू टिकले या सराईत दारू विक्रेत्याला ६ महिन्याकरिता जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश दिला. परंतु तडीपारीचा कालावधी पूर्ण होण्याआधीच तो मूळ गावी आपल्या घरी परतला. घरात लपून राहू लागला. त्याने प्रशासनाच्या आदेशाची अव्हेलना केली. कवडू टिकले हा तडीपार असलेला गुन्हेगार गावात रहात असल्याची माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी पोलिस पथकाला गावात पाठवून त्याच्या घराची झडती घेतली असता तो घरीच आढळून आला. त्याला ताब्यात घेत पोलिस स्टेशनला आणून त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करित न्यायालयात हजार करण्यात आले. 

दुसऱ्या कार्यवाहीत पोलिसांनी वेळाबाई या गावात अवैधरित्या दारू विकणाऱ्या कुमार झाडे याला अटक केली. त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यालाही न्यायालयात हजार करण्यात आले. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलिप पाटील भुजबळ, अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे, यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या आदेशानुसार शिरपूर पोलिस स्टेशनला दोन पेक्षा जास्त गुन्हे नोंद असणाऱ्या गुन्हेगारांचा कृती आराखडा तयार करून त्यांच्यावर जिल्हा प्रतिबंधक कार्यवाही करण्याकरिता प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असलेल्यांवर वचक निर्माण करण्याकरिता पोलिस स्टेशनकडून ही प्रभावी कार्यवाही करण्यात येणार आहे. तडिपारीचा आदेश असतांनाही जिल्ह्यात वावरणाऱ्या गुन्हेगारांवरही पोलिसांचे बारीक लक्ष राहणार आहे. तडीपार आरोपी जिल्ह्यात आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे. शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी गुन्हेगारी क्षेत्रावर सुरुवातीपासूनच करडी नजर ठेवली आहे. गुन्हेगारी फोफावणार नाही, याची दक्षता घेऊन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचा हतखंडाचं त्यांनी अवलंबिल्याने सध्यातरी गुन्हेगारी प्रवृत्ती नियंत्रणात आहे. 

सदर दोन्ही कारवाया जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड, सफौ निळकंठ आडे, पोहेकॉ प्रवीण गायकवाड, पोना अमोल कोवे, प्रमोद जुनुरकर, गंगाधर घोडाम, अनिल सुरपाम, नपोकॉ अभिजित कोषटवार, पोकॉ गजानन सावसाकडे, यांनी केल्या.
शिरपूर पोलिसांची दुहेरी कार्यवाही, एका तडीपाराला अटक तर दुसऱ्याला करणार तडीपार शिरपूर पोलिसांची दुहेरी कार्यवाही, एका तडीपाराला अटक तर दुसऱ्याला करणार तडीपार Reviewed by सह्याद्री चौफेर on November 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.