वणी येथे वणी प्रेमियर लीग क्रिकेट स्पर्धा रंगणार, इलेव्हन स्टार क्रिकेट क्लबचे आयोजन

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब च्या वतीने इलेव्हन स्टार वणी प्रेमियर लिग या मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वणी उपविभागा करिता ही प्रतियोगिता आयोजित करण्यात आली असून वणी, मारेगाव व झारी तालुक्यातील खेळाडूंना या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. ११ डिसेंबर ते २० डिसेंबर या काळात हे क्रिकेट सामने खेळले जाणार आहे. आयपीएल क्रिकेटच्या धरतीवर वणी येथे हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. कोरोना काळात खचलेल्या खेळाडूंचे मनोधर्य वाढविण्याच्या दृष्टीने ही क्रिकेट स्पर्धा महत्वपूर्ण ठरणार आहे. तालुकास्तरावरही खेळांचे संवर्धन व्हावे, ही महत्वाकांक्षा जोपासून इलेव्हन स्टार क्रिकेट क्लबने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. 

जवळपास ४० वर्षांपूर्वी इलेव्हन स्टार या क्रिकेट क्लबची स्थापना झाली. क्रिकेटच्या निरनिराळ्या स्पर्धा या क्लबच्या माध्यमातून आयोजित करण्यात आल्या. आता देशात धूम असलेल्या आयपीएल क्रिकेटच्या धर्तीवर वणी प्रेमियर लीग या मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे वणी येथे आयोजन केले आहे. ही स्पर्धा केवळ वणी उपविभागातील खेळाडूंकरिता राहणार आहे. वणी, मारेगाव व झरी येथील स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी २८ नोव्हेंबर पर्यंत आयोजकांकडे आपले रजिष्ट्रेशन करायचे आहे. रजिष्ट्रेशन शुल्क ३०० रुपये आहे. खेळाडूंची त्यांच्या खेळातील योग्यतेनुसार बोली लागणार आहे. प्रत्येक टीमचा एक मालक राहणार आहे. वणी उपविभागातीलच टिम फ्रँचायझी आमंत्रित करण्यात आले. खूप जणांनी फ्रँचायझी घेण्यास तयारी दर्शविली. त्यातून २० फ्रँचायझीची बोली लावण्याकरिता निवड करण्यात आली आहे. एका फ्रँचायझीला १४ झळाडूंची बोली लावता येणार असून खेळाडू विकत घेण्याची सीमा २० हजार रुपयांपर्यंत राहणार आहे. प्रत्येक फ्रँचायझीला ३५ वर्ष वयोगट व त्यापेक्षा जास्त वय असलेले किमान तीन खेळाडू तरी सामन्यात खेळवावे लागणार आहे. 

हे क्रिकेट सामने टेनिस बॉलने खेळले जाणार असून लीग पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. प्रत्येक क्रिकेट टीमला सात लीग सामने खेळावे लागणार आहे. ज्या चार टीम अव्वल राहतील त्या उपांत्यफेरी करिता पात्र ठरतील. उपांत्यफेरीत ज्या दोन टीम अव्वल राहतील त्यांच्यात मुख्य लढत होईल. प्रत्येकी आठ षटकांचे हे सामने असणार आहे. उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या टीमला प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ असे बक्षिस देण्यात येईल. ही नाविन्यपूर्ण क्रिकेट स्पर्धा प्रेक्षकांना बघण्याकरिता खुली राहणार असून वणी उपविभागातील नागरिकांनी ही प्रतियोगिता बघण्याकरिता उपस्थिती दर्शवून खेळाडूंचा उत्साह वाढविण्याचे आव्हान वणी प्रेमियर लीगचे आयोजक नदीम शेख, शैलेश ढोके, विनोद निमकर, राकेश बुग्गेवार, राजाभाऊ पाथरटकर, राजेंद्र मदान, मंगेश करांडे, संतोष चिल्कावार यांनी केले आहे.
वणी येथे वणी प्रेमियर लीग क्रिकेट स्पर्धा रंगणार, इलेव्हन स्टार क्रिकेट क्लबचे आयोजन वणी येथे वणी प्रेमियर लीग क्रिकेट स्पर्धा रंगणार, इलेव्हन स्टार क्रिकेट क्लबचे आयोजन  Reviewed by सह्याद्री चौफेर on November 21, 2021 Rating: 5
Powered by Blogger.