सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे
वरोरा : तालुक्यात अवैध रेती साठयासह अवैध रेती तस्करी करणार्यांचे प्रमाण वाढले असून नवीन उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या धडक कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.पैशाची आवक मंदावल्याने रेती तस्करांनी आता नवीनच शक्कल लढवून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रेती चोरी करून काळ्या बाजारात विकण्याचा गोरखधंदा सुरू केल्याचे शहरात निदर्शनास येत आहे.
तालुक्यातील अर्ध्याअधिक रेती घाटांचे लिलाव झालेले नसून याचा विपरीत परिणाम बांधकाम उद्योगांवर झालेला असून रेती मिळणे कठीण झालेले आहे.काही बांधकाम कंत्राटदारांनी आणि काही घरमालकांनी वैध मार्गाने आपल्या कामासाठी रेती साठा साठवून ठेवला असून या रेती साठ्यांवर रेती चोरांची नजर जात आहे. दिवसभर शहरात भ्रमंती करून कोणत्या ठिकाणी किती रेती साठा ठेवलेला आहे आणि तो कायदेशीर किंवा बेकायदेशीर याची शहानिशा न करता हे रेती चोर मध्यरात्रीला या रेती साठ्यातून ट्रॅक्टर च्या माध्यमातून रेती चोरी करीत असून रात्रीलाच ठराविक ग्राहकाला चढ्या दरात रेती विक्री करण्याचे प्रकार शहरात घडत आहेत. त्यामुळे शहरात चर्चांना उधाण आलेले आलेले आहे. एखाद्याने यावर आक्षेप घेतला तर तुमची रेती बेकायदेशीर असून एखाद्या बड्या अधिकार्याचे नाव सांगून दमदाटी करून त्याला चूप बसविले जात आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारे रेतीची चोरी करणारे कुणी एक व्यक्ती नसून हे टोळीचे काम असले पाहिजे याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहे. रेती चोरीच्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढत असून पोलिस प्रशासनाने या सर्व प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.
वरोरा शहरात अवैध रेती चोरांचा सुळसुळाट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 22, 2021
Rating:
