सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (६ ऑक्टो.) : चंद्रपूरचे भूतपूर्व नगराध्यक्ष तथा जटपूरा गेट वार्ड निवासी गयाचरण त्रिवेदी यांची काल रात्री दीर्घ आजाराने प्राणज्याेत मालवली. उपचारार्थ त्यांना नागपूरात हलविण्यांत आले हाेते .चंद्रपूरात परत आणल्यानंतर काल त्यांनी या जगाचा कायमचा निराेप घेतला. धन्नू महाराज या नावाने ते चंद्रपूर नगरीत सर्वत्र परिचित हाेते. धन्नू महाराज यांनी नगराध्यक्ष असतांना आपल्या शिस्तीने प्रशासनावर अंकुश ठेवत चंद्रपूरात अनेक असाधारण गोष्टी सहज शक्य करून दाखविल्यात. त्यांच्याच कार्य काळात चंद्रपुरची प्रमुख ओळख असलेली सात मजली इमारत उभी राहिली. आज त्यांच्या जाण्याने चंद्रपूरकरांनी एक शिस्तप्रिय आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व कायमच गमावलं असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी धन्नू महाराज त्रिवेदी यांच्या निधनानंतर दिलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
धन्नू महाराज हे यशस्वी राजकारण्यासह उत्तम व्यवसायिकही होते. त्यांचे अनेक राजकीय पक्षातील लोकांशी चांगले संबध होते. आमदार झाल्यानंतर चंद्रपूरच्या विकासासाठी त्यांनी मला अनेकदा अनेक सूचना केल्यात त्यातून चंद्रपूरच्या विकासासाठी त्यांची असलेली तळमळ जाणवायची. मी नुकतीच त्यांची भेट घेतली होती. ते नगराध्यक्ष असतांना मनपा प्रशासनावर त्यांची उत्तम पकड होती. त्यांच्या कार्यकाळात झालेली कामे दर्जेदार असायची. आज त्यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्राची मोठी हाणी झाली असल्याचे आ. जोरगेवार यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
चंद्रपूरचे भूतपूर्व नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी यांची प्राणज्याेत मालवली
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 06, 2021
Rating:
