सह्याद्री न्यूज : प्रशांत चंदनखेडे
वणी, (४ ऑक्टो.) : ग्रामपंचायतेची यंदाची निवडणूक झाल्यापासून सत्तेत आलेल्या पॅनलने कोरोना लॉकडाऊनच्या नियमांचा संदर्भ देत ग्रामसभा घेण्याचे टाळले. पण लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतरही ग्रामसभा घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत होती. जनतेच्या समस्या व तक्रारी ऐकून घेण्याकरिता राजूर ग्रामपंचायतेने महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी ग्रामसभा घ्यावी अशी मागणी राजूर विकास संघर्ष समितीने केली होती. त्यावरून ग्रामपंचायतेने ४ ऑक्टोबरला पहिली ग्रामसभा घेतली. निवडणुकीनंतरची पहिलीच ग्रामसभा असल्याने राजूरवासियांनीही मोठ्या संख्येने ग्रामसभेला हजेरी लावली. ग्रामसभेत सुज्ञ नागरिकांनी व लोकनेत्यांनी गावातील समस्या मांडून त्या सोडविण्याची मागणी केली. ग्रामसभा गाजली ती घरकुलाच्या मुद्द्याने. वेकोलिच्या जागेवर जवळपास २०० पेक्षाही जास्त घरांची वस्ती आहे. सर्व रोज मजुरी करणारा गरीब वर्ग याच ठिकाणी वास्तव्याला आहे. सर्वात मोठा लाभार्थी वर्ग याठिकाणी वास्तव्यास असतांना देखील या जागेवर घरकुल मंजूर करण्यास ग्रामपंचायतेने असमर्थता दर्शविल्याने या गरीब वर्गाला घरकुलापासून वंचित रहावे लागणार आहे. हा निर्णय ग्रामपंचायतेने घेतल्यापासून येथील रहिवाशांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. वेकोलिच्या या जागेवर ३० ते ३५ वर्षांपासून नागरिकांचं वास्तव्य आहे. येथील लाभार्थ्यांची घरकुल यादीत नावे देखील आली आहेत. पण वेकोलि जागेच्या मुद्द्यावरून घरकुल मंजूर करण्यास अडांगा घालत आहे. ग्रामपंचायत येथील घरांना विद्युत व पाणी या सारख्या सुविधा पुरवीत आहे. या वस्तीतून जिल्हा परिषदेंतर्गत सिमेंट रस्ताही बांधण्यात आला. ग्रामपंचायतेनेही रस्ते सुधार योजनेंतर्गत याठिकाणी रस्ते बांधले. मग घरकुलाचा लाभ का नाही, असा प्रश्न येथील रहिवाशांनी ग्रामसभेत उपस्थित केला. यावर ग्रामसेवकांनी वेकोलीशी चर्चा करू असे उत्तर दिले. पण यावरून येथे रहात असलेल्या नागरिकांचे समाधान न झाल्याने त्यांनी घरकुलाच्या यादीत या जागेवर रहात असलेल्या नागरिकांची देखील नावे समाविष्ट करावी, अशी मागणी करून निवेदन दिले. लॉकडाऊन काळानंतर राजूर येथे पहिलीच ग्रामसभा झाली. वर्षातून चार ग्रामसभा घेणे जरुरी असते. त्यामुळे ग्रामसभा घेण्याची नागरिकांची आग्रही मागणी होती. त्यानुसार ४ ऑक्टोबरला ग्रामपंचायतेच्या वतीने ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत गावातील विकासात्मक कामांवर चर्चा झाली. सामाजिक कार्यकर्ते कुमार मोहरमपुरी यांनी अनेक विकासकामा संदर्भातील मुद्दे उपस्थित केले. गावातील समस्या मांडल्या. नंतर ग्रामसचिवांनी विकासकामांची यादी वाचून दाखविली. अतिशय शांततेत ही ग्रामसभा पार पडली. लोकप्रतिनिधींनी उपस्थितांचे प्रश्न व उपस्थितांनी लोकप्रतिनिधींचे उत्तरे शांतपणे ऐकून घेतली. घरकुल वाटप करतांना कुठल्याही गरिबांवर अन्याय होणार नसल्याचे सरपंच विद्याताई पेरकावार यांनी या ग्रामसभेत स्पष्ट केले. या आधी वेकोलिच्या या जागेवर घरकुल मिळाले आता का नाही, असा प्रश्न येथील रहिवासीयांनी उपस्थित केल्यानंतर सरपंच विद्याताई पेरकावार यांनी वेकोलीशी चर्चा करून जागेची मागणी करणार असल्याची ग्वाही दिली. सर्वांचेच समाधान होईल अशी चर्चा राजूर ग्रामपंचायतेच्या या ग्रामसभेत झाली.
राजूर येथील ग्रामसभेत गाजला वेकोलिच्या जागेवरील घरकुलाचा मुद्दा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 05, 2021
Rating:
