सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (१३ ऑक्टो.) : शेतात केलेल्या लागवडीची ऑनलाईन नोंदणी करून पेरा सातबाऱ्यावर उतरविण्याकरिता शासनाने ई-पिक पहाणी ऍप विकसित केला आहे. खरीप व रब्बी हंगामात शेतात कोणत्या पिकांची लागवड केली, याची ऑनलाईन माहिती सादर करण्याकरिता शेतकऱ्यांनी या ऍप चा उपयोग करायचा आहे. या ई-पिक पहाणी ऍप मध्ये शेतात पिकविलेल्या पिकांची छायाचित्र काढून शेतकऱ्यांनी स्वतः या ऍप वर अपलोड करायचे आहे. ही ई-पिक पाहणी करून या ऍप वर अपलोड करण्यासंदर्भातील विस्तृत माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत शासकीय कृषी विद्यालय नागपूर येथील कृषी कन्या वैशाली नरेश गजभिये यांनी वरोरा तालुक्यातील पाटाळा येथील शेतकऱ्यांना दिली. ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत घेण्यात येणाऱ्या ई-पिक पाहणी मार्गदर्शन शिबिरात भटाळा येथील शेतकऱ्यांना वैशाली गजभिये यांनी ई-पिक पहाणी ऍप बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. शेतातील पिकांची ई-पिक पहाणी ऍप च्या माध्यमातून ऑनलाईन माहिती नोंदवायची आहे. २०२१-२२ या महसूल वर्षांपासून सातबाऱ्यावर पिकांची नोंदणी मोबाईल मधील ई-पिक पहाणी ऍप च्या माध्यमातूनच होणार आहे. या ऍप वर पिकांची माहिती कशी नोंदवावी व हा ऍप कसा हाताळावा याबद्दल अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना पुरेपूर माहिती नाही. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही या ई-पिक पहाणी ऍप बद्दल माहिती मिळावी, याकरिता या विद्यार्थिनीने भटाळा येथील शेतकऱ्यांना विस्तृत .मार्गदर्शन केले. तसेच ई-पिक पहाणी ऍप वर शेतातील पिकांची नोंदणी कशी करावी व माहिती कशी भरावी याबद्दल अगदीच सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन व मोबाईल नाहीत, अशा शेतकऱ्यांच्या शेत बांधावर जाऊन त्यांना ई-पिक पहाणी करण्यात मदतही केली.
या ई-पिक पहाणी मार्गदर्शन शिबिरात भटाळा ग्रामपंचायतचे उपसरपंच रघुनाथ जाधव यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ई-पिक पहाणी ऍप बद्दल भटाळा येथील शेतकऱ्यांना कृषी विद्यार्थिनी कडून मार्गदर्शन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 13, 2021
Rating:
