शहर व तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीकरणाला दिली जात आहे बगल

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (२५ सप्टें.) : खनिज संपत्तीने नटलेला वणी तालुका सोई सुविधांपासून मात्र कोसो दूर राहिला आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे तालुक्याचा विकास खुंटला आहे. तालुक्याचा विकास साधण्याकडे लोकप्रतिनिधींनी नेहमीच दुर्लक्ष केले आहे. खनिज निधीचा नेमका वापर कुठे होतो, व तो कुठे खर्च केल्या जातो, हेच कळायला मार्ग नाही. की, खनिज निधी इतरत्र वळवला जातो याचीच शंका येते. शहरासह तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. शहरापासून तर गाव खेड्यांपर्यंत रस्ते बांधणी व रस्ते दुरुस्तीकरणाची ओरड होत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं करून नागरिक खस्ता झालेल्या या रस्त्यांकडे संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करित आहेत. तालुक्यातील बहुतांश मुख्य मार्गांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामीण भागांकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही गावांकडे जाणारे तर रस्तेच खड्ड्यात गेले आहे. या रस्त्यांनी वाहन चालविणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. जीवावर उद्धार होऊन दुचाकीने प्रवास करावा लागत आहे. मागील काही महिन्यांपासून नागरिक ढोलकी तबला वाजवून, खड्ड्यात बसून निरनिराळ्या पद्धतीने रस्त्यांच्या दुरुस्तीकरणाकरिता आंदोलनं करित आहे. पण लोकप्रतिनिधींना त्यांचा आवाजच ऐकू येईनासा झाला आहे. नागरिकांच्या आंदोलनाची दखल घेणेच आता लोकप्रतिनिधींनी बंद केले आहे. नागरिकांचा कळवळा फक्त निवडणुकी पुरताच असतो. 

खड्ड्यातून मार्ग काढतांना कित्येकांच्या जीवावर बितले आहे, खड्डे चुकवितांना अनेकांचे अपघात झाले आहे, पावसामुळे खड्डे कळत नाही की, रस्ता उमजत नाही, पांदण रस्त्यागत प्रमुख रस्त्यांची अवस्था झाली आहे, छोट्या वाहनधारकांचा या रस्त्यांवरून प्रवासाचं कठीण झाला आहे, पण याचे कुणाला काय, निवडणूक आली की आश्वासन द्यायचे, मग करायचे सर्वांना बाय. लोकप्रतिनिधींचा दुर्लक्षितपणाच तालुक्याच्या विकासाला भोवला आहे. गाव शहरातील समस्यांवर आवाज उठवणारेही राजकारण्यांच्या दावणीला बांधले आहेत. गाव शहरातील समस्यांना घेऊन संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींशी भिडणारे जनतेचे पाठीराखेही राजकारण्यांची चाटूगिरी करण्यात व्यस्त झाले आहेत. राजकारण्यांशी सलगी ठेवण्यात धन्यता मानू लागले आहेत. समस्यांना घेऊन होणाऱ्या आंदोलनाची हवा काढण्याचं कामही हेच चाटूगिरी करणारे करतात. लोकप्रतिनिधींची शाबासकी मिळविण्याकरिता कोणत्याही स्तराला जाणारी ही प्रवृत्ती विकास कार्यात बाधा ठरत आहे. खड्डेमय रस्त्यांचा तालुका म्हणून वणी तालुक्याची ओळख होऊ लागली आहे. बाहेर ठिकाणावरून या रस्त्यांनी प्रवास करित वणीला येणारा प्रवासी काय रस्ते आहे, हा एकच शब्द उच्चारतो. रस्त्यांच्या दुरुस्तीकरणाकरिता शहरासह ग्रामीण भागातील नागरिकही टाहो फोडत आहे. पण त्यांना जा हो म्हणण्यापलीकडे कोणतीच कामे केल्या जात नाही. 
शहरातील रस्त्यांची अवस्थाही काही वेगळी नाही. शहरातून जाणाऱ्या वणी वरोरा या प्रमुख रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गांधी चौकातील रस्ताही पूर्ण खड्ड्यात गेला आहे. गणेशपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. पंचशील नगर मार्गे जाणारा रस्ताही खड्डेमय झाला आहे. विठ्ठलवाडी एसबी लॉन मार्गे जाणारा रस्ता पूर्णत्वास न आल्याने या रस्त्यावर एसबी लॉन जवळच तळं साचलेलं असतं. देशमुखवाडी कडून वडगाव रेल्वे क्रॉसिंग पर्यंत जाणारा रस्ताही अद्याप पूर्णत्वास आलेला नाही. टिळक चौकातून टागोर चौक मार्गे दीपक चौपाटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरही ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. चिखलगांव रेल्वे क्रॉसिंग पासून चिखलगाव पर्यंतचा रस्ताही खड्ड्यांनी व्यापलेला आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीकरणाची मागील काही महिन्यांपासून जोरदार मागणी होत असतांना देखील संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित आहे. या रस्त्यांची कधी सुधारणा होईल, हे आता येणारा काळच सांगेल.
शहर व तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीकरणाला दिली जात आहे बगल शहर व तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीकरणाला दिली जात आहे बगल Reviewed by सह्याद्री चौफेर on September 25, 2021 Rating: 5
Powered by Blogger.