रासा येथील कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

                        (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (२३ सप्टें.) : तालुक्यातील रासा गाव शिवारात भरविण्यात येणाऱ्या कोंबड बाजारावर डीबी पथकाने धाड टाकून कोंबड्यांच्या झुंजीवर पैशाची बाजी खेळणाऱ्या पाच आरोपींना अटक केली आहे. पोलिस आल्याचा सुगावा लागताच काही जण मात्र घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून चार झुंजीच्या कोंबड्यासह १ लाख ५० हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला आहे. 

रासा या गावात कोंबड बाजार भरविला जात असल्याची गुप्त माहिती डीबी पथकाला मिळाली. कोंबड्यांच्या झुंजीवर पैशाची बाजी खेळली जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी २२ सप्टेंबरला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास रासा या गावात जाऊन तलावाजवळील भवानी मातेच्या मंदिराखाली सुरु असलेल्या कोंबड बाजारावर धाड टाकली. पोलिस आल्याचे कळताच कोंबड्यांवर जुगार खेळणारे काही जण सुसाट पळत सुटले तर पाच आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये शंकर महादेव वरपटकर (४३), प्रकाश उर्फ भद्या नामदेव पेचे (३६), मदन बापूराव बोबडे (३०), देवराव शामराव अस्वले (६०), बापूजी नामदेव तांदुळकर (६२) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(ब), १२(क) नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळावरून चार झुंजीचे कोंबडे किंमत ११५० रुपये, नऊ लोखंडी धारदार काती किंमत १८०० रुपये, तिन मोटार सायकल किंमत १ लाख ३५ हजार रुपये, चार मोबाईल किंमत ९००० रुपये व ४ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, डीबी पथक प्रमुख आनंदराव पिंगळे, डीबी पथकाचे अशोक टेकाळे, हरिन्द्रकुमार भारती, पंकज उंबरकर, दीपक वान्ड्रूसवार विशाल गेडाम, शंकर चौधरी, अनंता इरपाते, वासुदेव नारनवरे, वसीम शेख यांनी केली.
रासा येथील कोंबड बाजारावर पोलिसांची धाड रासा येथील कोंबड बाजारावर पोलिसांची धाड Reviewed by सह्याद्री चौफेर on September 23, 2021 Rating: 5
Powered by Blogger.