डुकरांचा बंदोबस्त न केल्यास नगरपालिकेला घेराव घालण्याचा प्रमोद निकुरे यांचा इशारा

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (२४ सप्टें.) : डुकरांच्या हौदोसाने शहरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. शहरात डुकरांची संख्या प्रचंड वाढली असून जिकडे तिकडेच डुकरांचा वावर दिसून येत आहे. डुकरांचा बंदोबस्त करण्याची अनेक दिवसांची मागणी असतांना देखील नगरपालिका याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करित आहे. प्रमुख रस्त्यांवरही डुकरे उच्छाद घालत असल्याने दुचाकी वाहनांच्या अपघाताचे ते कारण ठरत आहे. काही भागातील डुकरे इतकी निर्ढावली आहेत की, त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केल्यास ती माणसांवरच चवताळतात. सांडपाणी टाकण्याकरिता घराबाहेर निघणाऱ्या महिलांना तर ही डुकरे वैतागवाणं करून सोडतात. सांडपाणी टाकतांना डुकरे अंगावर धावून येत असल्याने महिलांना घरातील एका सदस्याची सोबत घ्यावी लागत आहे. घराच्या अंगणातून दाराच्या उंबरठ्या पर्यंत जाण्याइतपत डुकरे निर्धास्तली असल्याचे पाहायला मिळत आहे. घरकामात व्यस्त असलेल्या नागरिकांच्या घरात शिरून डुकरांनी त्यांच्या शिजलेल्या अन्नावर ताव मारल्याचे प्रकारही काही ठिकाणी पाहायला मिळाले आहेत. डुकरांच्या या उच्छादाने शहरवासी कमालीचे संतापले असून डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करू लागले आहेत. डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नागरपालिकेचं दुर्लक्ष होत असल्याने आता शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद निकुरे यांनी नगरपालिका मुख्याधिकारी यांना १५ दिवसांत डुकरांचा बंदोबस्त करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. पंधरा दिवसांत डुकरांचा बंदोबस्त न केल्यास नगरपालिकेला घेराव घालण्याचा इशाराही प्रमोद निकुरे यांनी दिला आहे. 

शहरात डुकरांची संख्या कमालीची वाढली आहे. डुकरांच्या हौदोसाने नागरिक कमालीचे संतापले आहेत. गल्लीबोळात व प्रमुख रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात डुकरांचा वावर दिसून येत आहे. घाणीने भरलेल्या डुकरांचा सगळीकडे मुक्त संचार सुरु असतो. त्यांच्या अंग झडतीने घाणीचे शिंतोडे नागरिकांच्या घर अंगणातील वस्तूंवर उडत असल्याने नागरिकांचा चांगलाच मनःस्ताप होत आहे. गटार गंगेत लोळून ही डुकरे भरबाजारात व प्रमुख रस्त्यांवर मुक्त संचार करित असतात. बाजारात व रस्त्यांवर सैरावैरा पळत सुटणाऱ्या या डुकरांमुळे नागरिकांचा गोंधळ उडत असून रहदारीला अडसर ठरणाऱ्या या डुकरांमुळे कित्येकदा अपघातही घडले आहेत. घाणपाण्यात लोळून घर अंगणात व परिसरात घाण पसरविणारी ही डुकरे रोगराई वाढविण्याचं काम करित आहे. शहरातील काही भागात अस्वच्छता व घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. डुकरं त्या घाणीला चिवडून ती घाण दूरवर पसरवितात. त्यामुळे परिसरात कमालीची सुगंधी पसरलेली असते.

नगरपालिकेने निर्जंतुकीकरणाच्या फवारण्याही करणे बंद केले आहे. अशातच संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. शहरात स्वच्छता ठेवण्याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. डुकरांचा बंदोबस्तही करण्यास नगरपालिका उदासीनता दर्शवत आहे. शहरातील जैताई नगर, राजीव गांधी चौक, नागरवाला जीन, प्रभाग क्रं. ५, विठ्ठलवाडी या भागांसह संपूर्ण शहरातच डुकरांची उत्पत्ती वाढली आहे. गौरकार ले-आऊट परिसर तर डुकराचं माहेर घर बनलं आहे. या परिसरातील काही भाग झाडाझुडपांनी वेढलेला असल्याने याठिकाणी प्रजननाकरिता डुकरे आणून सोडली जातात. डुकरांच्या हौदोसाने येथील जनता कमालीची त्रस्त झाली आहे. डुकरांचे कळप दिवसभर या परिसरात मुक्त संचार करित असतात. डुकरांचा अंगण व आवारात मुक्त संचार रहात असल्याने विठ्ठलवाडी व गौरकार ले-आऊट परिसरातील नागरिक कमालीचे वैतागले आहेत. डुकरे घर आवारात येऊन घाण करू नये म्हणून या परिसरातील बहुतांश घरसमोर गुलाबी पाणी भरलेल्या शिश्या लटकलेल्या दिसतात.

डुकरांच्या हौदोसाने शहरातील जनता वैतागवाणी झाली असून, या मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शहर काँगेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद निकुरे यांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. पंधरा दिवसांत डुकरांचा बंदोबस्त न केल्यास नगरपालिकेला घेराव घालण्याचा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे.
डुकरांचा बंदोबस्त न केल्यास नगरपालिकेला घेराव घालण्याचा प्रमोद निकुरे यांचा इशारा डुकरांचा बंदोबस्त न केल्यास नगरपालिकेला घेराव घालण्याचा प्रमोद निकुरे यांचा इशारा Reviewed by सह्याद्री चौफेर on September 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.