सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
यवतमाळ, (०४ ऑगस्ट) : मूलभूत सुविधांपासून वंचित असणाऱ्या पारधी समाजाकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही.लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाकडून नेहमी बेदखल असणाऱ्या पारधी लोकांना ठक्कर बाप्पा योजनेच्या लाभासाठी ताटकळत राहावे लागते आहे.त्यामुळे त्रस्त झालेल्या पारधी बांधवांनी आज गुरुदेव युवा संघाच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेवर धडक दिली.त्यांच्या प्रश्नाकडे जिल्हा परिषद प्रशासन लक्ष देत नसल्याने जमलेल्या शेकडो पारधी बांधवांनी मडके फोडून निषेध नोंदवला.
तालुक्यातील कापरा येथील पारधी बेड्यावर ७०० लोकांची वस्ती आहे. त्या ठिकाणी त्यांना कुठलीच सुविधा मिळत नाही. रमाई घरकुल तसेच पंतप्रधान आवास योजनेचा देखील या पारधी बांधवांना लाभ मिळाला नाही. त्यांना मूलभूत सुविधा मिळण्यासह पक्की घरे मिळावी या करिता गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम हे सातत्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. परंतु, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना पोकळ आश्वासन देत असल्याने त्यांनी आज नाईलाजाने जिल्हा परिषदेसमोर मडकी फोडून आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी सीईओकडे निवेदन सादर केले. जिल्हा परिषदेकडून वेळ मारून नेत असल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केला आहे. एका आठवड्यात या पारधी बांधवांचा प्रश्न निकाली काढू अशी ग्वाही त्यांनी गेडाम यांना दिली. आंदोलनात कापरा येथील मंगेश नांदूरकर, शीतल घोसले, करणलाल पवार, अक्षय राठोड,सटकेपुर घोसले, गणेश राठोड, नितेश पवार,बरकजानी राठोड,जलीम घोसले आदी सहभागी झाले होते.
जो पर्यंत पारधी बांधवांना घरकुल योजनेसह इतर मूलभूत सुविधा मिळत नाही तोपर्यंत मी लढणार आहे. यांच्या समस्या तसेच मागण्या निकाली काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काही दिवसांचा अवधी मागितला आहे. त्यामुळे आता कामे पूर्ण होण्याची वाट आहे. पारध्यांचे काम पुन्हा रेंगाळले तर यानंतर पूर्णपणे नग्न होऊन मी स्वतः तीव्र आंदोलन छेडणार आहे.
- मनोज गेडाम
अध्यक्ष,गुरुदेव युवा संघ
"कापरा येथे पंतप्रधान आवास योजना पारधी बेड्यावरील ६१ नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पक्की घरे मंजूर झाली आहे. परंतु, प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे ते आजही या योजनेपासून वंचित आहे."
घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने पारध्यांची जि.प. वर धडक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 04, 2021
Rating:
