सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (०४ ऑगस्ट) : राहत्या घरी मटका जुगाराचा खेळ चालविणाऱ्या ११ आरोपींना डीबी पथकाने अटक केली आहे. शहरातील सावरकर चौकातील एका निवासस्थानी सट्टा मटका खेळला जात असल्याची गुप्त माहिती डीबी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे डीबी पथकाने सावरकर चौकातील निवासस्थानी धाड टाकली असता वरच्या माळ्यावर काही जण मटका जुगारावर पैशाची बाजी लावतांना आढळून आले. पोलिसांनी घटना स्थळावरून मटका जुगाराचा खेळ चालविणाऱ्या मुख्य सूत्रधारासह ११ आरारोपींना अटक केली असून त्यांच्या कडून २ लाख ७४ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही ३ ऑगष्टला दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उषिरापर्यंत चालली.शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याच्या पोलिस प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या असतांनाही शहरात छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरूच असल्याचे दिसून येत आहे. शहरातील काही भागात आजही सट्टा मटका सुरूच असून अत्यंत गोपनीयता बाळगत सट्टा मटका खेळवला जात आहे. कुठे पट्टी फाडून तर कुठे मोबाईल वरून मटका लावल्या जात असल्याचे शहरात दिसून येत आहे. काहींनी तर निर्जनस्थळी आपले बस्तान मांडले आहे. तर काही जण गल्ली बोळात मटक्यांचे आकडे घेतांना दिसून येत आहे. वस्तीतील पडक्या मोडक्या घरात मटक्याचा खेळ चालविणाऱ्यांचे या धाडीमुळे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत.
शहरातील गजबजलेल्या सावरकर चौकातील सादिक अब्दुल हमिद याच्या निवासस्थानी सट्टा मटका सुरु असल्याची विश्वसनीय माहिती डीबी पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे डीबी पथकाने सादिक याच्या निवासस्थानी धाड टाकली असता वरच्या माळ्यावर मटका जुगार सुरु असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घराची झडती घेतली असता एका खोलीमध्ये मटका जुगारावर पैशाची बाजी लावतांना काही जण आढळून आले. पोलिसांनी सट्टा मटका चालविणाऱ्या सादिक शेख हमिद (३०) रा. सावरकर चौक याच्यासह ११ आरोपींना घटनास्थळावरून अटक केली. अन्य आरोपींमध्ये अकबर हनिफ शेख (३४) रा. शास्त्री नगर, मोसीन राजू शेख (२३) रा. एकतानगर, दीपक शंकर गांडलेवार (२४) रा. रंगनाथ नगर, नावेद आरिफ शेख (२८) रा. सैलानी हॉस्पिटल जवळ वरोरा, राहुल किशोर गावंडे (२६) रा. शास्त्रीनगर, शेख गफ्फार शेख सत्तार (३४) रा. शास्त्रीनगर, अकरम अकबर बेग (३२) रा. शास्त्री नगर, समीर शेख हसन शेख रा. वणी, सुशिल मदन कुमार अग्रवाल ह. मु. एकतानगर, मुस्तफा खान मुसा खान (१९) रा. शास्त्रीनगर यांचा समावेश आहे. पोलिसांनी अकराही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४,५ व भादंवि च्या १८८, २६९ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी रोख ३२९० रुपये, १६ मोबाईल हँडसेट किंमत १ लाख ४९ हजार, गाडी व इतर साहित्य किंमत २०५०, दोन मोपेड दुचाकी किंमत १ लाख २० हजार असा एकूण २ लाख ७४ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात पो.नि. वैभव जाधव, डीबी पथकाचे पोउपनि गोपाल जाधव, पोहवा सुदर्शन वानोळे, पोना सुधिर पांडे, सुनिल खंडागळे, महेन्द्र भरती, पोकॉ पंकज उंबरकर, दीपक वान्ड्रूसवार, विशाल गेडाम, मपोका प्रगती काकडे, यांनी केली.
राहत्या घरी सुरु असलेल्या मटका जुगारावर डीबी पथकाची धाड, ११ आरोपींना केली अटक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 04, 2021
Rating:
