शेतकरी कृषी मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, शेतकरी संतप्त


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (०८ ऑगस्ट) : तालुक्यातील शेतकऱ्यांचे नगदी पीक कपाशी, मात्र यावर बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन कार्यशाळा होणे  अपेक्षित आहे. परंतु तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची ओरड आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासून कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव येत आहे. तो यंदा ही आला असून, याबाबत मोलाचे मार्गदर्शन मिळावे या अपेक्षेने तालुक्यातील शेतकरी प्रतीक्षेत आहे. परंतु कार्यशाळा होत नसल्याने शेतकरी यासाठी पर्यायी मार्ग शोधत आहे. मात्र, हा पर्यायी म्हणून अती विषारी कीटकनाशके  शेतकऱ्यांना बाधक ठरत आहे. त्या पाच जहाल अती विषारी कीटक नाशकांवर बंदी घालण्यात आली असतांना ही तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या पुण्याईने  प्रतिबंधित कीटकनाशकं तालुक्यातील अनेक कृषी केंद्रात मागच्या दाराने विकली जात असल्याचे  शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. परिणामी वानोली येथील शेतकऱ्याला यातूनच जीव गमवावा लागला. विनोद वसराम चव्हाण (४०) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव आला म्हणून त्यांनी अती विषारी कीटकनाशक कपाशी वर फवारणी केली. परंतु या जहाल कीटक नाशकाची विष बाधा होऊन त्याचा मृत्यू झाला. जिल्ह्यासह महागांव तालुक्यात अनेक कृषी केंद्रात मागच्या दारातून विकली जाणारी कीटकनाशक रोखण्यात यावी व महागांव तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यशाळा राबवण्याकडे लक्ष घालावे, अशी आग्रही मागणी शेताकऱ्यांतून होत आहे.
शेतकरी कृषी मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, शेतकरी संतप्त शेतकरी कृषी मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत : अधिकाऱ्यांचे  दुर्लक्ष, शेतकरी संतप्त Reviewed by सह्याद्री चौफेर on August 08, 2021 Rating: 5
Powered by Blogger.