महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला कलंक फासणांऱ्या त्या नराधमांना अटक करा- नरेंद्र सोनारकर

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२३ ऑगस्ट) : जिल्ह्यातील जिवती तालुक्यात दुर्गम भागात असलेल्या वणी या गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दलित समाजातील महिला , वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केली. या घटनेत ८ जण जखमी असून सात गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यांत आले आहे .हा अत्यंत संतापजनक प्रकार असून,या मुळे महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला कलंक फासला गेला असून,या घटनेला जबाबदार असणांऱ्या गावकरी,पोलीस पाटील,सरपंच आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची,तथा हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणांऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांनी केली आहे. 
    
शनिवारी घडलेल्या या धक्कादायक प्रकरणा बाबत स्थानिक पोलीस गंभीर दिसत नाहीत. पोलिसांनी काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी घटनेबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे . त्यामुळे दोन दिवस उलटूनही या गंभीर प्रकरणाची कुठेही वाच्यता होऊ नये,व प्रकरण दडपण्यात यावे यासाठी पोलीस स्वतः प्रयत्न करीत असल्याने अद्यापही या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण,पोलिसांनी किती लोकांवर गुन्हे दाखल केले? याबाबत काहीही माहिती देण्यास स्थानिक पोलिसांनी नकार देत असल्याचा गंभीर आरोपही सोनारकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रकातून केला आहे . 
       
प्राथमिक माहितीनुसार गावातील दोन - तीन महिलांच्या अंगात देवी आली आणि त्यांनी दलित समाजातील वयाने ज्येष्ठ आठ-लोकांची नावे घेऊन त्यांनी गावातील लोकांना भानामती केल्याचे सांगितले .त्याला बळी पडून गावातील काही लोकांनी त्या सर्वाना भरचौकात खांबांना बांधून मारहाण केली . वृद्ध महिलांसह लहान मुलांनाही मारहाण करण्यात आली.त्यामुळे अंगात देवी आणणाऱ्या 'त्या' दोन महिला या घटनेस कारणीभूत असून त्यांनाही तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

एकुणच महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला काळिमा फासणारी ही घटना असून,या प्रकरणातील प्रत्यक्ष आरोपी,गावातील सरपंच,पोलीस पाटील यांच्यावरही गंभीर गुन्हा दाखल करावा,प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावरही कडक कार्यवाही करण्यात यावी,जेणेकरून पुरोगामी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असे संतापजनक प्रकार घडवून आणण्याची कुणी हिम्मत करणार नाही;असे ही पत्रकात शेवटी नमूद करण्यात आले आहे.

येत्या दोन दिवसात या प्रकरणातील सर्वच दोषींना अटक करून कठोर कार्यवाही न झाल्यास पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सबंध महाराष्ट्र भर तीव्र निदर्शने करण्यात येतील,असा इशारा देखिल देण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला कलंक फासणांऱ्या त्या नराधमांना अटक करा- नरेंद्र सोनारकर महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला कलंक फासणांऱ्या त्या नराधमांना अटक करा- नरेंद्र सोनारकर Reviewed by सह्याद्री चौफेर on August 23, 2021 Rating: 5
Powered by Blogger.