सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (१८ ऑगस्ट) : एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक झेंड्याची तोडफोड करून विडंबना करण्यात आल्याची निंदनीय घटना काल १७ ऑगष्टला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास वणी तालुक्यातील बोरगांव (अहेरी) या गावात उघडकीस आली. या घटनेने समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याने काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच ठाणेदारांनी स्वतः पोलिस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. धार्मिक झेंड्याची विडंबना करणाऱ्या समाजकंटकाला पोलिसांनी तत्काळ अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आल्याने बोरगाव येथील वातावरण शांतीपूर्ण आहे.बोरगांव येथिल क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक येथे आदिवासी समाजाचे धार्मिक कार्यक्रम होत असतात. आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या बिरसा मुंडा यांचे तैलचित्र याठिकाणी लावण्यात आले असून जय सेवा सप्तरंगी झेंडाही याठिकाणी बसविण्यात आला आहे. याठिकाणी आदिवासी समाज बांधव आपले विविध धार्मिक कार्यक्रम एकत्रित येऊन साजरे करित असतात. काल रात्री गावातीलच एका समाजकंटकाने जय सेवा सप्तरंगी झेंड्याचा ओटा फोडून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. एकेकाळी गावातील तंटामुक्तीचा अध्यक्ष असलेल्या या इसमाने गावातच तंटा निर्माण केल्याने गावकऱ्यांमधून संताप व्यक्त केल्या जात आहे. विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावून सामाजिक सलोख्यात वितुष्ट आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलल्या जात आहे. धार्मिक तेढ निर्माण करून गावातील एकोप्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या संतप्त भावना गावातून ऐकायला मिळत आहे. धार्मिक स्थळाची विडंबना करून समाजात अराजकता पसरविणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध समाजाच्या वतीने पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे. सचिन गुलाबराव मडावी (३४) रा. बोरगांव यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रघुविर बाजीराव कारेकार (३५) रा. बोरगांव (अहेरी) या समाजकंटकाला तत्काळ अटक करून त्याच्यावर भादंवि च्या कलम २९५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार वैभव जाधव यांनी प्रकरणाची गंभिरता लक्षात घेत स्वतः घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. आरोपीला अटक करण्यात आल्याने बोरगांव येथील वातावरण शांतीपूर्ण आहे.
पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पिएसआय अरुण नाकतोडे करित आहे.