टॉप बातम्या

वणी बसस्थानकात प्रवाशांना लुटणाऱ्या दोन आरोपींना अवघ्या काही तासांतच पोलिसांनी केली अटक

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (०३ ऑगस्ट) : गावी जाण्याकरिता बस न मिळाल्याने वणी बसस्थानकावर थांबून असलेल्या दोन प्रवाशांना दमदाटी करून त्यांच्याकडील पैसे हिसकावणाऱ्या दोन आरोपींना अवघ्या काही तासातच पोलिसांनी अटक केली.

रात्री उशिरा बाहेरगाव वरून आलेल्या या प्रवाशांना बसच्या वेळा संपल्याने गावाकडे जाण्यास इतर कुठलेही साधन न मिळाल्याने ते बसस्थानकावरच थांबले. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास तेथे दोन युवक आले. त्यांनी या दोन्ही प्रवाशांना दमदाटी करून त्यांचे खिसे तपासणे सुरु केले. त्यातील एका प्रवाशाच्या खिशात व बॅगेत असलेले १२०० रुपये जबरदस्ती हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला. बसस्थानकासारख्या ठिकाणी पैसे लूटण्यात आल्याने धास्तावलेल्या प्रवाशांनी वणी पोलिस स्टेशन गाठून अज्ञात लुटारूंविरुद्ध तक्रार नोंदविली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी शहरात त्यांचा शोध घेऊन अवघ्या काही तासांतच दोन्ही आरोपींना अटक केली. त्यातील एक आरोपी हा पोलिस रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार आहे.  

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील रहिवासी असलेले रामदास बापूराव वाभीटकर (४१) हे रात्री उशिरा यवतमाळ वरून वणीला आले. त्यानंतर त्यांना कोरपना येथे जाण्याकरिता बस न मिळाल्याने ते बसस्थानकावरच थांबले. त्यांच्या सोबत मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील रहिवासी असलेले संतोष दौलत फेफरे हे देखील होते. दोघांनाही पुढील प्रवासाकरिता बस न मिळाल्याने त्यांनी बसस्थानकाचा आसरा घेतला. रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान तेथे दोन चोरटे आले, व त्यांना धाकदपट करून जबरदस्ती त्यांचे खिशे तपासु लागले. रामदास वाभीटकर यांच्या खिशातील व बॅगेतील १२०० हिसकावून त्यांनी पोबारा केला. लुटमारीच्या या घटनेने दोन्ही प्रवासी चांगलेच धास्तावले. त्यांनी पोलिस स्टेशन गाठून पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तसेच दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध रीतसर तक्रार नोंदविली.

रात्रपाळीत कर्तव्यावर असलेले पोउपनि आनंदराव पिंगळे यांनी रात्रीच तपास करून अवघ्या काही तासातच दोन्ही आरोपींना अटक केली. सागर उर्फ गोलू मोहन फुसाटे (२५) रा. वणी व अनिकेत दादाराव कुमरे (१९) रा. सिंधी मारेगाव अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. त्यांच्या कडून चोरी केलेले ११०० रुपये व दुचाकी असा ११ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यांच्यावर भादंवि च्या कलम २९२, ३४ नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

सदर कार्यवाही एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, सपोनि आनंदराव पिंगळे, पोकॉ. वसीम शेख, चालक सुरेश किनाके यांनी केली. पुढील तपास जमादार विठ्ठल बुर्रेवार करीत आहे.
Previous Post Next Post