तालुक्यात भुरट्या चोरांचा धुमाकूळ, मानकी गावात ५० हजारांची घरफोडी

                           (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (०६ ऑगस्ट) : शहर व तालुक्यात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला असून या भुरट्या चोरांची नागरिकांनी आता चांगलीच धास्ती घेतली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सतत चोरीच्या होणाऱ्या कारवायांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पै पै करून जुळविलेल्या पैशांवर तसेच सुवर्ण वस्तूंवर चोरटे डल्ला मारत असल्याने नागरिकांमध्ये कमालीचा संताप दिसून येत आहे. साखर झोपेत असतांना नागरिकांच्या घरात शिरून चोरटे चोरीचा डाव साधत आहे. त्यामुळे रहिवासी आता कमालीचे भयभीत झाले आहेत. तालुक्यातील मानकी या गावात काल रात्रीच्या दरम्यान चोरट्यांनी एका घराला टार्गेट केले असून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला आहे. ४ ते ५ ऑगष्ट दरम्यान रात्रीच्या वेळेला चोरटे घरात शिरले व कपाटातील रोख रक्कम व सोन्याचांदीच्या दागिन्यांवर हात साफ केला. याबाबत पोलिस स्टेशनला प्राप्त झालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
मानकी या गावात संजय शालिक पुंड (३७) हे परिवारासह राहतात. ते रहात असलेल्या घराला दरवाजाच नसल्याचे समजते. संपूर्ण परिवार रात्री गाढ झोपेत असतांना चोरटे घरात शिरले व चोरीचा डाव साधला. कपाटात ठेऊन असलेले पैसे व सुवर्ण वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. सकाळी कुटुंब झोपेतून जागे झाल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. घरातील पैसे व दागिने चोरीला गेल्याचे दिसून येताच घरमालक संजय शालिक पुंड यांनी वणी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. तक्रारीमध्ये त्यांनी रोख १३ हजार ५०० रुपये, सोन्याची पोत, लहान मुलाचा सोन्याचा गोप, सोन्याच्या दोन अंगठ्या, सोन्याची जिवती, तीन जोडी चांदीच्या तोरड्या, सोन्याचे कानातील डूल असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि च्या कलम ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.
तालुक्यात भुरट्या चोरांचा धुमाकूळ, मानकी गावात ५० हजारांची घरफोडी तालुक्यात भुरट्या चोरांचा धुमाकूळ, मानकी गावात ५० हजारांची घरफोडी Reviewed by सह्याद्री चौफेर on August 06, 2021 Rating: 5
Powered by Blogger.