सणासुदीच्या काळातील प्रवासाला नंदीग्राम धावून येइल काय हो !

सह्याद्री न्यूज प्रशांत चंदनखेडे 
वणी, (२२ ऑगस्ट) : सणासुदीच्या काळात नातेवाईकांच्या भेटीगाठी घेण्याचा बेत आखल्या जात असल्याने या काळात प्रवासाचे योग जुळून येतात. दूरवर असलेले नातेसंबंधातील लोक सणाच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जाऊन एकत्रित सण साजरे करण्याचा आनंद घेत असतात. त्यामुळे याकाळात प्रवास घडून येत होत असून प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढलेली असते. वणी येथे परप्रांतीय व परजिल्ह्यातील मजूर व कर्मचारी मोठ्या प्रमाणात कामाला आहेत. सणासुदीचे दिवस सुरु झल्याने ते ही आपापल्या गावाकडे जाण्याचे बेत आखत आहेत. सुखकर प्रवासाकरिता नागरिक प्रथम पसंती देतात ते रेल्वे प्रवासाला. वणी येथून प्रवासी रेल्वे सुरु झाल्यापासून शहर व तालुक्यातील प्रवाशांचा कल नेहमी रेल्वे प्रवासाकडेच राहिला आहे. पण कोरोना लॉकडाऊन पासून रेल्वे गाड्यांचं तारतम्यच बिघडलं आहे. कोरोनाच्या लाटांमुळे अद्यापही रेल्वे प्रवासाची वाट मोकळी झालेली नाही. बहुतांश मार्गांवरील रेल्वे गाड्या अद्यापही सुरु करण्यात न आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होतांना दिसत आहे. पॅसेंजर गाड्या सुरु नसल्याने ग्रामीण प्रवाशांचा प्रवासाचा मार्ग मोठा खडतड झाला आहे. रेल्वे गाड्या पूर्णपणे सुरु न झाल्याने प्रवास करतांना मोठे अडथळे निर्माण होत असून नाईलाजास्तव प्रवाशांना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. वणी येथून प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाला नंदीग्राम एक्सप्रेसची नेहमी उणीव भासतांना दिसते. नागपूर मुंबई व्हाया नांदेड मार्गाने धावणारी नंदीग्राम एक्सप्रेस कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून बंद ठेवण्यात आली आहे. वणी तालुक्यातील जनतेच्या प्रवासाची धुरा वाहणारी नंदीग्राम एक्सप्रेस प्रवाशांच्या खास पसंतीस उतरली होती. प्रतिदिन प्रवाशांच्या सेवेत सज्ज राहणारी नंदीग्राम एक्सप्रेस कोरोनामुळे प्रवाशांपासून दुरावल्या गेली आहे. जनतेला अंगाखांद्यावर बसून प्रवास करवणारी लोकवाहिनी दीर्घकालावधी नंतरही रुळावर न आल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. परिवाराला स्वस्त व सुखद प्रवासाचा आनंद देणारी प्रवासदायिनी बंद असल्याने येथील प्रवाशांची परवड तर होतच आहे, पण रस्तेमार्गाने प्रवास करतांना प्रवासखर्च वाढत असल्याने त्यांना चांगलाच मनःस्ताप सहन करावा लागत आहे. नंदीग्राम एक्सप्रेस सुरु होण्याची ओढ आता प्रवाशांना लागली असून ही गाडी कधी रुळावरून धावते याकडे येथील प्रवाशांचे लक्ष लागले आहे. 
जिकडे तिकडेच प्रवासी रेल्वेचं जाळं विणलं जात असतांना रेल्वेला मालवाहतुकीतून प्रचंड उत्पन्न मिळवून देणाऱ्या वणी वरून मात्र ब्रॅडगेज रेल्वे लाईन असतांनाही एकही प्रवासी रेल्वे धावत नव्हती. रेल्वे प्रवासी संघटनांनी आंदोलन, मोर्चे, निवेदने देऊन रेल्वे विभागाचे याकडे नेहमी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. रेल्वे प्रवासी संघटनांच्या अथक प्रयत्नानंतर रेल्वे विभागाने या मार्गाने प्रवासी रेल्वे चालविण्याला हिरवी झंडी दिली. २००७ मध्ये नागपूर मुंबई व्हाया नांदेड ही पहिली लांब पल्ल्याची प्रवासी रेल्वे वणी वरून सुरु करण्यात आली. तालुक्यातील जनतेला, याठिकाणी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांना व नांदेड आदिलाबाद येथील नागरिकांना नागपूर प्रवासाकरिता नंदीग्राम एक्सप्रेस एकप्रकारचा दुवा ठरली. अल्पावधीतच नंदीग्राम एक्सप्रेस प्रवाशांच्या खास पसंतीस उतरली. वणीचे वांझोटे रेल्वे स्टेशन नंदीग्राम एक्सप्रेस सुरु झाल्याने बहरून गेले. प्रवासाठीची हक्काची गाडी म्हणून नंदिग्रामची ख्याती झाली. नंदिग्रामाचे प्रवासी वाढल्याने ऑटो चालकांच्याही धंद्यात बरकत आली. ऑटोंची रेलचेल रेल्वे स्टेशनची काही वेळ का होई ना शोभा वाढवत होती. पण कोरोना महामारी आली व जनतेच्या हक्काची प्रवासी गाडीचं बंद झाली. कोरोनाच्या लाटांमुळे नंदिग्रामची वाट अजूनही मोकळी झालेली नाही. ही लोकवाहिनी नामोहरम तर होणार नाही ना, या शकांनी प्रवाशांचं काळीज धस्स होत आहे. नंदीग्राम नंतर वणी वरून लांब पल्ल्याच्या साप्ताहिक रेल्वेही चालू करण्यात आल्या. कोरोना काळात त्याही बंद होत्या. पण कोरोना निवळताच पाटणा-पूर्णा एक्सप्रेस, धनबाद-कोल्हापूर (दीक्षाभूमी) एक्सप्रेस, कोलकत्ता-नांदेड (संत्राकांछी) एक्सप्रेस या साप्ताहिक गाड्या सुरु करण्यात आल्या. पण प्रवाशांच्या प्रतीक्षेत असणारी नंदीग्राम एक्सप्रेस मात्र अद्यापही सुरु न झाल्याने प्रवाशांची घोर निराशा झाली आहे. साप्ताहिक रेल्वे गाड्यांपैकी केवळ काजीपेठ-मुंबई (ताडोबा) ही एकमेव एक्सप्रेस बंद ठेवण्यात आली आहे. नंदीग्राम एक्सप्रेसने प्रवास करणारा मोठा प्रवासीवर्ग आहे. नंदीग्राम एक्सप्रेसने सवलतीत प्रवास व्हायचा. आता प्रवासाकरिता अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे. सणासुदीच्या काळात प्रवासाचे सत्र सुरु झाले आहे. त्यामुळे नंदिग्रामच्या आठवणीने प्रवाशांचा उर दाटून येऊ लागला आहे. नंदीग्राम एक्सप्रेस केंव्हा सुरु होईल हा एकाच प्रश्न काहूर माजवू लागला आहे. नंदीग्राम सुरु होण्याची तालुक्यातील जनता चातकासारखी प्रतीक्षा करित आहे. त्यांची प्रतीक्षा केंव्हा संपवायची हे आता रेल्वे विभागावर अवलंबून आहे.
सणासुदीच्या काळातील प्रवासाला नंदीग्राम धावून येइल काय हो ! सणासुदीच्या काळातील प्रवासाला नंदीग्राम धावून येइल काय हो ! Reviewed by सह्याद्री चौफेर on August 22, 2021 Rating: 5
Powered by Blogger.