सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (०१ ऑगस्ट) : अलगद निर्माण झालेली ओळख मोबाईल वरील संवादावरून आणखीच फुलत गेली. व्हाट्सअप चॅटिंग वरून तर ती आणखीच बहरात आली. शब्दांनी शब्द वाढले. नंतर भावनिक शब्दांनी जवळीक वाढली. संवादातून नात घट्ट होत गेलं. एकमेकांविषयी ओढ वाढली. वयाचं भान हरपलं. मन हपापलं व मर्यादा सुटल्या. संयमाचे बांध फुटले. संगतीतून रंगतीत आलेल्या जवळकीने व्याकुळता संपली, व देहभान हरपून ते एकमेकांत लिन झाले. सहवासातील आनंद अनुभवल्यानंतर कायम सोबत राहण्याची गळ घातल्या गेली. महिलेचा कायम हक्काचा दर्जा देण्याचा हट्टाहास वाढला. तिने दोघात निर्माण झालेले बंध विवाह बंधनात बांधण्याचा आग्रह धरला. नंतर विवाह करण्याचा तगादाच लावून दबाव आणण्याचा प्रयत्न केल्या गेला. आनंद लुटतांना भान हरपलेल्या व्यक्तीची चिंता वाढली. कारण आनंद लुटणाऱ्यांचे आधीच संसार थाटलेले. तो समजदार वयातील मुलाबाळांचा पालक व शासकीय नोकरदार व्यक्ती. त्यामुळे त्याने एकांतातील सहवासाला जगापुढे आणण्यास कायम नकार दिला. स्वतः केलेल्या मौजमजेमुळे कुटूंब अडचणीत येऊ नये, म्हणून त्याने लग्नाची शक्यताच नाकारली. ती त्याच्याशी लग्न करण्यावर ठाम राहिल्याने त्याचे सामंजस्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. तिने तीन चार दिवसांआधी त्याचे घर गाठून तिथेच राहण्याचा आग्रह धरला. पण त्याने नकार देताच तिने विष प्राशन केले. नंतर खाजगी रुग्णालयात उपचार झाले. त्याचा लग्न करण्यास नकारच राहिल्याने तिने त्याच्या विरुद्ध शारीरिक शोषण केल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. दोघांमध्ये उठलेलं शारीरिक वादळ पोलिस स्टेशनला येऊन धडकलं. व त्यांच्यातील शारीरिक संबंध चव्हाट्यावर आले. तिच्या नवऱ्याचा तर पताच नाही पण त्याची बायको लाजिरवाणी होऊनही आपल्या पतीला अटकेपासून वाचाविण्याकरिता धडपडत होती. तक्रार न करण्यास तिच्या समोर पदर पसरत होती. पण तिने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पतीला तिच्याशी लग्न करण्यास संमती देण्याची अटच पत्नी समोर ठेवल्याने तिची मनधरणी करणच कठीण झालं. मान, मर्यादा, प्रतिष्ठा क्षणिक सुखाचे बळी ठरले. सावज हेरला, सावजाला फासतही अडकवलं पण सावजाची शिकार करण्यात अपयश आल्याचं शल्य कुठं तरी बोचत होतं. सुखाचा संसार सुरु असतांना पर स्त्रीचा नाद सुखी संसाराचा घात करून गेला. घरचं सुख सोडून बाहेर तोंड मारणं त्याच्या चांगलच अंगलट आलं. आपुलकीच छत सोडून त्याला आता तुरुंगात जावं लागलं.
परस्त्रीच्या नादाने केला सुखी संसाराचा घात, शारीरिक शोषणाच्या आरोपात जावे लागले ना आत !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 01, 2021
Rating:
