सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (११ ऑगस्ट) : महागांव तालुक्यातील फुलसावंगी येथील मुन्ना हेलिकॉप्टर चा ट्रायल घेताना अचानक फॅन तुटल्याने २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
फुलसावंगी रहिवाशी शेख इस्माईल उर्फ मुन्ना शेख इब्राहिम (२४) असे त्याचे नाव आहे. मुन्ना हा वेल्डिंग काम करणार प्रामाणिक कारागीर असून, मुन्ना गेल्या दोन वर्षांपासून हेलिकॉप्टर बनवण्यासाठी कष्ट घेत होता. आलमारी, कुलर, असे विविध उपकरणं बनवत असतांना त्याला एक दिवस हेलिकॉप्टर बनवायचं म्हणून त्याने ठरवलं. हेलिकॉप्टर बनवण्यासाठी त्याने एक एक पार्ट गोळा करून खूप मेहनत आणि कष्ट घेतले.
गेल्या दोन वर्षांपासूनचे त्याचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गांवर होते. तो रोज ट्रायलचे यशस्वी प्रयत्न करीत असताना त्याने हेलिकॉप्टर "मुन्ना हेलिकॉप्टर" असे नामकरण ही केले. येत्या १५ ऑगस्ट ला आपल्या कलेचे जगासमोर प्रदर्शन करण्याची जिद्द असतांना त्याने काल रात्रीच्या दरम्यान मुन्ना हेलिकॉप्टर ची ट्रायल उडान घेण्यासाठी ट्रायल घेतली असता, अचानक हेलिकॉप्टर मध्ये काही तरी बिघाड आले. हेलिकॉप्टर व्यवस्थित लँड केले. काय बिघाड झाले म्हणून मागे वळून पाहले असता, बॅलेनसिंग फॅन ना दुरुस्त वाटल्याने त्याकडे लक्ष वेधले. पण अचानक हेलिकॉप्टर चा मागचा मुख्य फॅन तुटला आणि मुन्ना च्या डोक्याला येऊन धडकला. मुन्ना च्या डोक्याला तो लागला असता, त्यात तो गंभीर जखमी झाला असून, उपचारादरम्यान मुन्ना चा मृत्यू झाला.
फुलसावंगी येथील ध्येयवेड्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने हेलिकॉप्टर बनवण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. शेख इस्माईल शेख इब्राहिम उर्फ मुन्ना यांच्या पश्चात वडील, आई, एक भाऊ, एक बहीण असा आप्त परिवार आहे.
"मुन्ना हेलिकॉप्टर" चा ट्रायल घेताना अपघात, १५ ऑगस्ट ला करणार होता लाँच
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 11, 2021
Rating:
