सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (१४ ऑगस्ट) : वरोरा येथे वास्तव्यास असलेल्या व मारेगाव पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक म्हणून कर्तव्यरत असलेल्या सुहास बापूजी झाडे (४७) यांचा ३ फेब्रुवारीला वणी मुकुटबन मार्गावरील एका शेताजवळील छोट्याशा पुलाच्या पाण्यात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता. त्यांचा हा मृत्यू आकस्मिक नसून त्यांच्या मृत्यू मागे कटकारस्थान असल्याचा संशय त्यांच्या पत्नीने व्यक्त केला आहे. त्यांना जीवे मारण्यात आलं असून त्यांचे खुनी अद्यापही मोकाट फिरत आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून योग्य तो न्याय देण्याची मागणी मृतक ग्रामसेवकाच्या पत्नीने अमरावती विभागाचे पोलिस आयुक्त यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.वरोरा येथील किल्लावार्ड येथे वास्तव्यास असलेला ग्रामसेवक मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दांडगाव, आपटी, मुकटा, गोरज या ग्रामपंचायतींचा ग्रामसेवक म्हणून कार्यभार सांभाळत होता. २ फेब्रुवारी २०२१ ला कार्यालयीन सभा असल्याचे सांगून तो एसटी बसने वरोरा वरून मारेगावला गेला. त्यादिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पंचायत समितीमध्ये सभा चालली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ग्रामसेवकाने पत्नीला फोन करून सभा संपली असल्याचे सांगत ऑटोने वणीला येत असल्याचे सांगितले. सायंकाळी ७.३० वाजता परत ग्रामसेवकाने पत्नीला फोन करून वणी वरून ऑटोने वरोरा येथे घरी येण्यास निघाल्याचे सांगितले. परंतु त्या दरम्यान पत्नी फोनवर बोलतच होती व फोन सुरु असूनही त्यांचा कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. नुसताच ऑटोचा आवाज येत होता. वणी वरून ७.३० वाजता वरोरा येथे जाण्यास निघालेला ग्रामसेवक बराच वेळ होऊनही घरी न पोहचल्याने पत्नीने परत ८.४५ वाजता त्याला फोन केला. तेंव्हा त्यांच्या मोबालमधून स्पष्ट आवाज ऐकू येत नव्हता. त्याला पत्नीने सरळ घरी येण्यास सांगितले. नंतर काही वेळाने त्यांचा मोबाईलच बंद झाला. काही वेळ त्यांचा फोन येण्याची वाट बघितल्यानंतर नातेवाईकांना कळवून त्यांचा शोध घेणे सुरु केले. दुसऱ्या दिवशी ३ फेब्रुवारीला वणी मुकुटबन मार्गावरील शेताजवळील छोट्याश्या पुलाच्या पाण्यात त्यांचा मृतदेहचं आढळून आला. अगदीच संशयास्पद स्थितीत त्यांचा मृतदेह आढळल्याने त्यांना जीवे मारण्यात आल्याचा संशय पत्नीने व्यक्त केला असून खुन्यांना अटक करून न्याय देण्याची मागणी केली आहे. सायंकाळी ७.३० वाजता वणी येथील शिवाजी चौकातून ऑटोने वरोरा येथे घरी येण्यास निघालेला व्यक्ती विपरीत मार्गाकडे कसा काय गेला, ही पूर्णतः संशायस्पद बाब आहे. त्यांच्या मृतदेहाशेजारी त्यांची बॅग आढळून आली. पण मोबाईल व पैसे मात्र आढळले नाही. घटनेच्या दिवशी वणी येथील शिवाजी चौक येथे जाऊन नातेवाईकांनी ऑटो चालकांची चौकशी केली. नंतर ते ज्या व्यक्तीच्या ऑटोने गेले त्याच्याकडेही चौकशी केली. पण ऑटो चालकाकडून उडवाउडवीचीच उत्तरे मिळाली. शिवाजी चौकातील ऑटो पॉईंट जवळील किरकोळ दुकानदारांकडेही चौकशी केली. पण त्यांनीही उडवाउडवीचीच उत्तरे दिली. त्यांच्या खुनाचा कट शिवाजी चौक येथेच रचण्यात आला असून तेथून त्यांना मुकुटबन मार्गावर नेऊन जीवे मारण्यात आले. असा दाट संशय पत्नीने व्यक्त केला आहे. शिवाजी चौक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व पतीचे कॉल डिटेल्स तपासून पाहतांनाच ऑटो चालक व ऑटो पॉईंटवरील किरकोळ दुकानदारांची कसून चौकशी केल्यास पतीच्या खुनाचा राज उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही. पती ग्रामसेवक असल्याने संबंधित ग्रामपंचायतेशी संबंधित असणाऱ्यांचीही चौकशी होणे गरजेचे आहे. पतीच्या मृत्यू प्रकरणाचा तपास अत्यंत संथ गतीने सुरु असून अजूनही पोलिस कोणत्याही निकषांपर्यंत पोहचले नाही.
ग्रामसेवक सुभाष बापूजी झाडे यांचा खून करण्यात आला असून त्यांच्या खुनाचा जलद तपास करून खुन्यांना शिक्षा मिळण्याकरिता या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून योग्य तो न्याय देण्याची मागणी ग्रामसेवकाची पत्नी कविता सुहास झाडे यांनी अमरावती विभागाचे पोलिस आयुक्त यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
ग्रामसेवकाच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, पत्नीने केली मागणी !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 14, 2021
Rating:
