सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२२ ऑगस्ट) : वणी शहर व तालुक्यात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला असून चोरटे बंद घरांना टार्गेट करित आहे. ग्रामीण भागातील जनतेने तर या भुरट्या चोरांची चांगलीच धास्ती घेतली असून त्यांच्यावर रात्रीचे जागरण करण्याची वेळ आली आहे. गावात चोरांची एवढी दहशत निर्माण झाली आहे की, ग्रामीण जनतेला रात्रीचा पहारा द्यावा लागत आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे जनतेतून ऐकायला मिळत आहे. शहरातही चोरीच्या घटना वाढल्या असून काल २१ ऑगष्टला शहरातील रवीनगर येथे घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिन्यांवर हात साफ केला आहे. दागिने व रोख रक्कमेसह ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. चोरीची तक्रार पोलिस स्टेशनला करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.वेकोलिच्या कोलार पिंपरी कोळसा खाणीत कार्यरत असलेले व रवीनगर येथे किरायाने रहात असलेले रमेश गणपत भगत (५६) हे रक्षाबंधनानिमित्त बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला टार्गेट करून आपला डाव साधला. घराच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व घरातील बेड रूममध्ये असलेल्या लोखंडी कपाटातील रोख रक्कमेसह सोन्याचांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. २१ ऑगष्टला ते रक्षाबंधनाकरिता परिवारासह बाहेरगावी गेले होते. २१ ऑगष्टच्या रात्री ११ वाजता ते २२ ऑगष्टच्या सकाळी १०.३० वाजता दरम्यान ही चोरीची घटना घडल्याचे रमेश भगत यांनी तक्रारीत म्हटले आहे. ते गावावरून परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा खुला दिसल्याने घरी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी २२ ऑगष्टला दुपारी ३.५४ वाजता ते रहात असलेल्या घरी चोरी झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि च्या कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. घराला कुलूप असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी करून घरातील सोन्याचा नेकलेस १४.३७ ग्राम, सोन्याची चैन ०.७५ ग्राम, दोन सोन्याच्या अंगठ्या ०.८ ग्राम, एक जोड सोन्याचे कानातील टप ०.२ ग्राम, एक जोडी सोन्याच्या रिंगा ०.२ ग्राम, मंगळसूत्राचे सोन्याचे पाण ०.२ ग्राम, एक जोड कानातील सोन्याच्या बिऱ्या ०.१ ग्राम व रोख रक्कम १२ हजार रुपये असा एकूण ६७ हजार ३०५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. बंद घरांना टार्गेट करून चोरटे करित असलेल्या चोरीच्या कारवायांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करून त्यांना तुरुंगवारी करविणे गरजेचे झाले आहे.
पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस करितआहे.
रक्षाबंधनाच्या आनंदात विरजण, चोरट्यांनी लुटून नेले घरातील धन !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 22, 2021
Rating:
