सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (१७ ऑगस्ट) : सरकारने खाजगीकरणाचं धोरण अवलंबलं असून सरकारी मालमत्ता उद्योगपतींना विकण्याचा सपाटाच लावला आहे. सरकारने प्रत्येकचं क्षेत्राचं खाजगीकरण करण्यास सुरुवात केली आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्राचं खाजगीकरण करण्याचा सरकारने विडाच उचलला असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारने सरकारी क्षेत्रातील रिक्त पदेही भरणे बंद केले आहे. कालांतराने सरकारी नोकऱ्या बंद होऊन खाजगी नोकऱ्या मिळण्यातच समाधान मानावे लागणार आहे. कोल इंडियाचेही खाजगीकरण करण्याचा घाट सुरु असून कोळसा खदानी उद्योगपतींच्या ताब्यात देण्याच्या हालचाली सुरु आहेत. कोळसा खदाणीतील रिक्त पदेही भरली जात नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढू लागली असून अधिकारी कर्मचाऱ्यांवरील कामाचा तानही वाढला आहे. काही दिवसांनी सरकारी नोकरी एक स्वप्न ठरणार आहे. केंद्र सरकारच्या या खाजगीकरणा विरोधात उठणारा आवाज पूर्णतः दाबल्या जात आहे. सर्वांनी एकत्र येऊन लढा देऊ नये या करिता कोरोना लॉकडाऊनमध्ये सोयीस्कर खाजगीकरणाला सुरुवात करण्यात आली. याच काळात शेतकरी व कामगार विरोधी कायदेही तयार करण्यात आले. कोरोनाचा एक जुटीने सामना करण्याची वेळ असतांना सोशल डिस्टंसिंगच्या नावावर जनतेमध्ये मोठं अंतर निर्माण करून त्यांना एकमेकांपासून तोडण्याचं काम केल्या गेलं. परंतु आता एकजूट ठेऊन अन्यायाविरोधात लढा देण्याची वेळ आली असल्याचे उद्गार दिल्ली येथिल आयटकच्या राष्ट्रीय महासचिव कॉ.अमरजीत कौर यांनी संयुक्त खदान मजदूर संघाच्या कार्यालय उद्घाटन समारंभात काढले. वेकोलिच्या भालर वसाहतीतील संयुक्त मजदूर संघाच्या नवनिर्मित कार्यालयाचे उद्घाटन कॉ. अमरजीत कौर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्घाटनपर भाषणातून त्यांनी केंद्र सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणावर कडाडून टिका केली. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, कोरोनाचं योग्य नियोजन करण्यात सरकार पूर्णतः अपयशी ठरलं. कोरोनाच्या पहिल्या लाटेत गोर गरीब मजुरांचे मोठे हाल झाले. उपासमारीने कित्येक मजुरांचा जीव गेला तर आपापल्या गावी परततांना कित्येकांचा वाटेतच मृत्यू झाला. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून धडा घेत दुसरी लाट थोपविण्याचे सरकारचे कोणतेही पूर्वनियोजन नव्हते. कोरोनाची दुसरी लाट आली व लोकांचे जीव जाऊ लागले तेंव्हा सरकारच्या नियोजनाचे पाट वाहू लागले. कोरोना काळात सर्वात जास्त हाल अपेष्टा सामान्य नागरिकांच्या झाल्या. रोजगार धंदे बुडाले, नोकऱ्या गेल्या, जगण्याचेच वांदे झाले. बेरोजगारीच्या खायीत सर्वसामान्यांना लोटल्या गेलं. याउलट धनदांडग्यांच्या धनात मात्र घसघशीत वाढ झाली. अब्जाधीशांची संख्या या काळात १०० वरून १४० वर पोहचली. कोरोनाच्या या संकट काळात ४० अब्जाधीशांची भर पडली. यावरून सरकार कोणाच्या पाठीशी आहे, हे लक्षात येते. २४ अब्जाधीश तर आरोग्य विभागाशी जुडलेले आहे. आरोग्य विभागाला साहित्य पुरविण्याचं कंत्राट काही मर्जीतील उद्योगपतींना देण्यात आलं. दुसरी लाट निवळून तिसरी लाट येण्याच्या मार्गावर असतांनाही अजून जनतेचं लसीकरण पूर्ण झालेलं नाही. खाजगी रुग्णालयांना २५ टक्के लस जलद मिळते, तर ग्रामीण रुग्णालयात मात्र लसींचा नेहमी तुटवडाच राहतो. अशी विपरीत परिस्थिती आहे. ७० वर्षात पहिल्यांदा वैश्विक रोगराईचा सामना करतांना आपत्ती व्यवस्थापनातुन नागरिकांचे लसीकरण करता कित्येकांना लस स्वखर्चाने घ्यावी लागली आहे. शैक्षणिक क्षेत्राचंही खाजगीकरण सुरु असून शिक्षण महागल्याने शिक्षण घेणेही कठीण झाले आहे. घरची परिस्थीती हालाकीची असल्याने अल्पवयीन मुलांनाही मिळेल ती कामे करावी लागत असल्याने बालमजुरांची संख्या वाढू लागली आहे. ४ कोटी ९० लाख मुलं कोरोनाच्या या काळात बालमजूर झाले आहेत. ४० कोटी जनता बेरोजगार होण्याच्या मार्गावर आहे. दरवर्षी २ कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासनही फोल ठरले आहे. नेहमी खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली जात आहे. ४३ रेल्वे स्टेशनचे खाजगीकरण करण्यात आले आहे. कोल इंडियाचेही खाजगीकरण होत असतांना कामगार संघटनांनी आंदोलने केल्याने खाजगीकरणाची प्रक्रिया थांबविण्यात आली असली तरी खाजगीकरणाचा डाव सुरूच आहे. केंद्र सरकारच्या या खाजगीकरणाच्या धोरणाविरुद्ध एकजुटीने आवाज उठविण्याची आज गरज निर्माण झाली आहे. असे खणखणीत वक्तव्य त्यांनी यावेळी केले. संयुक्त खदान मजदूर संघाच्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.के.एम.एस अध्यक्ष कॉ. एन. टी. मस्के होते. तर मुख्य अतिथी म्हणून वेकोलिचे कार्मिक निवेशक संजयकुमार उपस्थित होते. यावेळी नवी दिल्ली येथील आयटक चे राष्ट्रीय सचिव कॉ. मोहन शर्मा, आयटकचे महाराष्ट्र सचिव शाम काळे, एस.के.एम.एस. चे महासचिव सी.जे. जोसेफ, वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक आई.डी. जंक्यानी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ. सी.जे. जोसेफ यांनी केले. संचालन आयटकचे क्षेत्रीय अध्यक्ष कॉ. सुनिल मोहितकर यांनी तर आभार प्रदर्शन आयटकचे क्षेत्री सचिव विजय गुडधे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
सरकारी क्षेत्राचं खाजगीकरण करण्याचा केंद्र सरकारने विडाच उचलला, कॉ. अमरजित कौर यांची खणखणीत टीका
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 17, 2021
Rating:
