सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (०८ ऑगस्ट) : वणी वरोरा मार्गावरील एका मंदिराजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर डिजल भरण्याकरिता येणारे ट्रक व ट्रेलर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेशिस्तपणे उभे केले जात असल्याने याठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे. रस्त्यावर तासंतास डिजल भरण्याकरिता वाहने उभी राहत असल्याने वळण घेणाऱ्यांना समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांआधी या पंपावर डिजल भरण्याकरिता विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या ट्रकमुळे या रस्त्यावर वळण घेतांना समोरून येणारे वाहन न दिसल्याने एका विद्यार्थिनीच्या दुचाकीला मोठा अपघात झाला होता. दैव बलवत्तर म्हणून ती बचावली. डिजल भरण्याकरिता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी केली जात असून अनियंत्रितपणे वाहने उभी करण्यात येत असल्याने रहदारीला मोठे अडथळे निर्माण होत आहे. डिजल भरल्यानंतर मागे पुढे न बघता सरळ रस्त्यावर वाहने आणली जात असल्याने कित्येक दुचाकीस्वार अपघात होण्यापासून थोडक्यात बचावले आहेत. अगदी रस्त्यालगतच पेट्रोलपंप असल्याने रस्त्यावरच ट्रक ट्रेलर सारखी मोठमोठी वाहने डिजेल भरण्याकरिता तासंतास रांगा लावून असतात. ही वाहने डिजल भरतांना व डिजल भरल्यानंतर भरधाव रस्त्यावरून जात येत असल्याने या वाहनांमुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तेंव्हा या बेशिस्तपणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला डिजल भरण्याकरिता उभ्या रहात असलेल्या ट्रकांना शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. डिजल भरण्याकरिता रस्त्यावर ट्रकांची लांबचलांब रांग लावून रहदारीला अडथळे निर्माण करणे व अपघाताला आमंत्रण देण्याचे प्रकार थांबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
वणी वरोरा मार्गावरील पेट्रोलपंपा समोर डिजल भरण्याकरिता लागतात वाहनांच्या रांगा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 08, 2021
Rating:
