मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्रासाठी CIDCO कडून भूखंड

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मुंबई, (१४ जुलै) : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय झाल्यानंतर आता उपकेंद्र उभारणीस गती मिळणार आहे. नवी मुंबईतील ऐरोली येथे हे उपकेंद्र होणार असून त्यासाठी लागणारा भूखंड सिडकोच्यावतीने मराठी भाषा विभागाला आज देण्यात आला. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी यासंबंधीची कागदपत्रे स्वीकारली.

नवी मुंबईतील या उपकेंद्रात भाषा संचालनालय, विश्वकोष महामंडळाची कार्यालये असतील. याशिवाय भव्य सभागृह, बालविभाग, ज्येष्ठ नागरिकांसाठी दालने असतील. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने ही वास्तू उभारली जाणार आहे.

अतिशय सुंदर असे हे उपकेंद्र असेल. नवी मुंबईत एक सांस्कृतिक केंद्र म्हणून हे भवन दिमाखात उभे राहणार आहे. मराठी संस्कृती जतनाच्या कार्यात यामुळे भर पडेल, असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला. यावेळी सिडको, एमआयडीसी व मराठी भाषा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्रासाठी CIDCO कडून भूखंड मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्रासाठी CIDCO कडून भूखंड Reviewed by सह्याद्री चौफेर on July 14, 2021 Rating: 5
Powered by Blogger.