सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२० जुलै) : वणी शहरातून ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांची फारच दुर्दशा झाली असून या रस्त्यांनी दुचाकींचा प्रवास अत्यंत धोकादायक झाला आहे. ग्रामीण भागांना जोडणाऱ्या या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही रस्त्यांची तर अक्षरशः चाळणी झाली आहे. काही ठिकाणचे रस्ते उखडून गिट्टी बाहेर येऊ लागली आहे. काही ठिकाणच्या रस्त्यांची तर पांदण रस्त्यांपेक्षाही वाईट अवस्था झाली आहे. काही भागांकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था एवढी दयनीय झाली आहे की, रस्त्यावर नुसते खड्डेच दिसतात रस्ता कुठे दिसतच नाही. या रस्त्यांनी वाहने चालविणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखे झाले आहे. या खड्डेमय रस्त्यांवर नेहमी छोटेमोठे अपघात घडत असतात. या रस्त्यांच्या दुरुस्तीकरणाकडे संबंधित विभाग पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे. मुबलक खनिज निधी मिळत असतांना देखील खनिज निधीतूनही या रस्त्यांची दुरुस्ती न करता नागरिकांच्या जीवाशी खेळले जात आहे.वणी वरून उकणीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून या रस्त्यावर अंतरा अंतरावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून दुचाकींचा प्रवास अतिशय जोखमीचा झाला आहे. रात्रीच्या वेळेला रस्त्यावरील खड्डे दिसत नसल्याने हे खड्डे अपघातास कारणीभूत ठरू लागले आहे. खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात कित्येक दुचाकीस्वार रस्त्यावर पडून जख्मी झाले आहेत. अपघाताचे कारण बनू पाहणाऱ्या या खड्डे जडीत रस्त्याच्या दुरुस्तीकारणाची मागणी निळापूर ब्राम्हणी येथील नागरिकांनी केली आहे.
वणी वरून उकणीकडे जाणाऱ्या या मार्गावर अनेक छोटी मोठी गावे आहेत. कोळसाखाणी कडे जाणारा हा प्रमुख मार्ग आहे.
कोळसाखाणीमध्ये कर्तव्यावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना याच रस्त्याने जाणे येणे करावे लागते. कोळसा वाहतूक करणारे ट्रक मोठ्या प्रमाणात या रस्त्याने धावत असतात. त्यामुळे नेहमीच या रस्त्याची दुर्दशा होत असते. या रस्त्याची डागडुजी न करता या रस्त्याचे मजबूत खडीकरण व डांबरीकरण करण्याची आवश्यक्ता आहे. वारंवार हा रास्ता तयार करण्यात येतो, व अल्पावधीतच हा रस्ता उखडून खड्डे तयार होतात. त्यामुळे एकदाच खनिज निधी खर्चून मजबूत रस्ता बांधण्याची मागणी गावकऱ्यांमधून होत आहे.
वणी ते उकणी या मार्गावर निळापूर, ब्राम्हणी, कोलेरा, पिंपरी, जुनाड, पिंपाळगाव, बोरगाव ही छोटी मोठी गावे येतात. या गावातील नागरिकांना नेहमी वणी येथे खरेदी करीता यावे लागते. शेतकऱ्यांनाही साहित्य खरेदीकरिता सतत शहरात चकरा माराव्या लागतात. या रस्त्याने दुचाकीनेच जास्त प्रवास करावा लागत असल्याने या रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे अपघातास आमंत्रण देत आहे. या रस्त्यावरून वाहने चालवितांना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे कित्येक दुचाकीस्वारांचे अपघात होऊन त्यांना किरकोळ जख्मा झाल्या आहेत.
वेकोलित व खाजगीत नोकरी करणाऱ्या नोकरदार वर्गांना रात्र पाळीत याच रस्त्याने कामावर जावे लागते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा रस्ता आता धोकादायक ठरू लागला आहे. या रस्त्याची वेळीच दुरुस्ती करण्याची मागणी गावकऱ्यांमधून होत आहे. संबंधित विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाकडे लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.
ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा, वणी उकणी मार्गावर पडले आहेत ठिकठिकाणी खड्डे !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 20, 2021
Rating:
