५०० खासगी बसेस! होणार एसटी च्या ताफ्यात दाखल


                                               (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मुंबई, (१२ जुलै) : सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठे परिवहन महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने खासगीकरणाच्या दिशेने एकेक पाऊल टाकण्यासा सुरूवात केली आहे. एसटीच्या ताफ्यात ५०० साध्या बसेस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय एसटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शिवशाही बसेसप्रमाणेच बस आणि चालक खासगी तर वाहक एसटीचा या तत्वानुसार या बसेस एसटीच्या ताफ्यात लवकरच दाखल होतील.

एसटी महामंडळाच्या पाच हजारांहून अधिक बसेसचे आयुर्मान संपले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला नवीन बसेसची तातडीने गरज आहे. आधीच हजारो कोटी रुपयांचा तोटा सहन करणाऱ्या एसटीचे कोरोना काळात उत्पन्न घटल्यामुळे हा तोटा आणखीच वाढला आहे. त्यामुळे स्वतःच्या खर्चाने एसटी महामंडळाला नवीन बसेस खरेदी करणे अशक्य आहे. म्हणून भाडेतत्वावर ५०० साध्या खासगी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला एसटीच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

येत्या महिनाभरात भाडेतत्वावर घ्यावयाच्या ५०० साध्या खासगी बसेससाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. या बसेस शक्य तितक्या लवकर एसटीच्या ताफ्यात दाखल व्हाव्यात असा महामंडळाचा प्रयत्न आहे. एसटीच्या ताफ्यात खासगी बसेस दाखल होणार असल्या तरी एकाही एसटी कामगाराच्या नोकरीवर गदा येणार नाही, असे एसटी महामंडळाने म्हटले आहे.

महाराष्ट्राची एसटी देशातील सर्वात मोठे परिवहन महामंडळ असले तरी ते तोट्यात आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश राज्य रस्ते परिवहन महामंडळात ३० टक्के बसेस भाडेतत्वावर आहेत. नफ्यात चालणारे देशातील ते एकमेव परिवहन महामंडळ आहे. भाडेतत्वावरील बसेसमुळे आस्थापना आणि देखभाल खर्चात बचत होते. उत्तर प्रदेशचा हा प्रयोग राज्यातही यशस्वी होईल, असा विश्वास एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात आजघडीला १६ हजार ५०० बसेस आहेत. त्यापैकी ५ हजाराहून अधिक बसेसचे आयुर्मान पूर्ण झाले आहे. आर्थिक अडचणीमुळे नवीन बसेस खरेदी करणे अशक्य असल्यामुळे संचालक मंडळाने भाडेतत्वावर खासगी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

‘एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक गुरूवारी झाली. या बैठकीत वाहतूक विभागाने परिवहन महामंडळासाठी ५०० साध्या बसेस भाडेतत्वावर घेण्यासाठी निविदा प्रक्रिया मागवण्याचा प्रस्ताव मांडला. चर्चेअंती या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.’

राजन शेलार
जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ
५०० खासगी बसेस! होणार एसटी च्या ताफ्यात दाखल ५०० खासगी बसेस! होणार एसटी च्या ताफ्यात दाखल Reviewed by सह्याद्री चौफेर on July 12, 2021 Rating: 5
Powered by Blogger.