सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (२७ जुलै) : झरी तालुक्यातील मार्की (खु.) येथील शेतकऱ्याचा साप चावल्याने मृत्यू झाल्याची घटना काल २६ जुलैला घडली. दत्ता विश्वनाथ थेरे (५०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारादरम्यान सदर शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दत्ता थेरे हा शेतकरी आपल्या शेतात काम करीत असतांना त्याला १९ जुलैला सर्पदंश झाला. त्यानंतर तत्काळ त्याला वणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे पाहून त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. सेवाग्राम येथे उपचार सुरु असतांना काल २६ जुलैला त्याचा मृत्यू झाला. दत्ता थेरे हा अल्प भूधारक शेतकरी होता. शेतीच्या उत्पन्नातून तो आपल्या परिवाराचा उदर्निवाह करीत होता. त्याचा असा हा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. त्याच्या पच्छात पत्नी व अविवाहित मुलगा असा आप्त परिवार आहे. एका मुलीचे लग्न झाले असून ती सासरी नांदत आहे.
सध्या शेतीचा हंगाम सुरु असल्याने शेतकरी शेत पिकांच्या मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. पावसाळ्यात सापही बिळा बाहेर निघत असून खाद्याच्या शोदात त्यांचा शेत शिवारात संचार सुरु असतो. अशातच शेतात कामे करणाऱ्यांचा त्यांना स्पर्श झाल्यास ते दंश करतात, व त्यात शेतकरी व शेत मजुरांचा नाहक बळी जातो. शेतात कामे करतांना साप चावल्याने शेतकरी व शेत मजुरांचा मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये अलीकडच्या काळात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे करतांना शेतकऱ्यांनी सावधानी बाळगणे अत्यंत जरुरीचे झाले आहे.
सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू , झरी तालुक्यातील मार्की (खु.) येथील घटना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 27, 2021
Rating:
