सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२० जुलै) : वणी शहरालगत असलेल्या राजूर (कॉलरी) येथे चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याने राजूर वासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंद घराचे कुलूप तोडून घरातील ऐवज लुटून नेण्याचे प्रकार आता चांगलेच वाढले आहे. त्याचबरोबर मध्यरात्री नागरिकांच्या घरात शिरून चोरी करण्याचा सपाटाच चोरट्यांनी लावल्याने राजूरकरांवर जागती करण्याची वेळ आली आहे.भुरट्या चोरांच्या उच्छादामुळे नागरिकांमध्ये घरातील व घराबाहेरील किंमती वस्तूंविषयी असुरक्षितता निर्माण झाली आहे. घरातील दागिने व रोख रक्कमेवर तर चोरटे डल्ला मारतच आहेत. पण घराच्या आवारातील किंमती साहित्यही चोरटे लंपास करीत आहेत. एवढेच नाही तर बिस्कीट पुडे व शिजलेले अन्नही चोरून नेल्या जात असल्याने चोरट्यांच्या या चोरी करण्याच्या प्रकाराने नागरिकही हबकले आहेत. मिनी इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजूर कॉलरी येथे प्रत्येक प्रांतातील नागरिक वास्तव्यास आहेत.
कोरोना लॉकडाऊनमुळे बेरोजगारीची झळ बसलेले गावातीलच काही युवक चोरीच्या मार्गाला लागल्याची चर्चा आहे. तसेच काही उपद्रवी युवकांनी गरजा व शौक भागविण्याकरिता गावातीलच घरांना टार्गेट करण्याचे प्रकार सुरु केल्याचेही बोलले जात आहे. काही दिवसांआधी घरफोडी करून ५० हजारांचा ऐवज चोरटयांनी लुटला तर १८ जुलैला मध्यरात्री घरात शिरून १८ हजारांचे सोन्याचांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. पोलिसांनी खबरी नेटवर्क कामाला लावलं असून लवकरच या भुरट्या चोरांच्या मुसक्या आवळण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.
राजूर (कॉलरी) येथे चोरीच सत्रच सुरु झालं आहे.
चोरटे बंद घरांना तर टार्गेट करतच आहेत. पण साखर झोपेत असलेल्या नागरिकांच्या घरात शिरून मौलिक वस्तू व किंमती साहित्यही लंपास करीत आहेत. बिस्किटचे पुडे व शिजलेले अन्नही चोरट्यांना कमी पडत आहे. या भुरट्या चोरांच्या चोरीच्या कारवायांनी राजूरवासी कमालीचे धास्तीत आले आहेत. त्यांच्यावर रात्र जागतीची वेळ आली आहे. नागरिकांना आता आपल्या वस्तूंविषयी असुरक्षितता वाटू लागली आहे. मेहनत मजुरी करून शिल्लक पाडलेला काही पैसा व तयार केल्या सुवर्ण वस्तू चोरांचं धन ठरत असल्याने सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट दिसून येत आहे. गावातीलच काही पोशिंदे आपल्या गरजा व शौक भागविण्याकरिता हाती लागेल त्या वस्तू व साहित्य चोरून नेत असल्याचा संशय येथील रहिवाशांमधून व्यक्त केला जात आहे.
१८ जुलैला रात्री राजूर कॅलरी येथील पिपलदफाई येथे राहणाऱ्या शब्बीर अहमद शगीर अहमद यांच्या घरची वारी करून चोरट्यांनी १८ हजारांच्या दागिन्यांची चोरी केली. रात्री २ ते २.३० वाजताच्या दरम्यान शब्बीर अहमद यांच्या घरात चोरटयांनी प्रवेश केला. घरात ठेऊन असलेली ५ तोळे चांदी व ३ ग्राम सोने अशा एकूण १८ हजार रुपये किंमतीच्या वस्तूंवर हात साफ करून चोरट्यांनी पोबारा केला. शब्बीर अहमद यांना घरी चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि च्या कलम ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. या भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
चोरटे साधत आहेत चोरीचा डाव, सर्वच चिंतेत आहेत यांना कसं धराव !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 20, 2021
Rating:
