वणी विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (२८ जुलै) : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस वणी विधानसभा क्षेत्रात अगदीच साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. राज्यावर एकामागून एक येणारं संकट व संकटात बळी पडलेल्या जनतेचं दुःख पचवता येण्यासारखं नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना शिवसैनिकांना दिल्या. राज्यावरील कोरोनाचं संकट टळलं नसतांनाच नैसर्गिक आपत्तीन राज्याला हादरवून सोडलं. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोच निसर्ग कोपला. पावसानं राज्यातील काही भागात थैमान घातलं. दरड कोसळली, आभाळ फाटलं, घरं पडली, घरं दबली. होत्याचं नव्हतं झालं. नद्या नाल्यांना पूर आले. पुराच्या पाण्यानं गावं वेढल्या गेली. माणसे वाहून गेली. कित्येकांना अकाली मरण आलं. कित्येक निष्पाप जीवांना जल समाधी मिळाली. कोरोना महामारीचा मृत्यू तांडव थांबत नाही तोच निसर्गानं उग्र रूप धारण केलं. आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. पाल्यापाचोळ्या प्रमाणे माणसे वाहून गेली. अशा या संकटाच्या काळात राज्यावर दुःखाचं सावट असतांना स्वतःचा वाढदिवस थाटामाटात साजरा करणं ही अतिशयोक्ती ठरेल, म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आपला वाढदिवस अत्यंत सध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना केल्या. राज्यातील तमाम शिवसैनिकांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर, होल्डिंग्ज व जाहिरातींवर पैशाची उधळण न करता पूरग्रस्तांना मदत करण्याचे आव्हान केल्याने वणी विधानसभा क्षेत्रात त्यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वासभाऊ नांदेकर यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करीत त्यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून शिवसेनेच्या टागोर चौक व नारायण निवास परिसरातील शाखा फलकाचे अनावरण केले. 
शहरातील टागोर चौकव नारायण निवास परिसरात शिवसेनेची शाखा तयार करण्यात आली असून मुख्यमंत्रांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रवी बोढेकर यांनी शाखा फलकाचे विधिवत पूजन करून अन्य सोपस्कार पार पाडले. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, शरद ठाकरे, युवासेना शहर प्रमुख निखिल येरणे, उपशहर प्रमुख महेश चौधरी, अजय चन्ने, धर्मा काकडे, उपशहर प्रमुख निलेश करडभुजे, अनुप चटप, सौरव खडसे, महिला शहर प्रमुख सविता सातपुते, महिला संघटक नंदाताई गुहे, युवासेना जिल्हा समन्वयक संतोष वऱ्हाटे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
वणी विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा वणी विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा Reviewed by सह्याद्री चौफेर on July 28, 2021 Rating: 5
Powered by Blogger.