मनसेची कोकणातील पुरग्रस्तांकरिता मोठी मदत, अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य भरलेला ट्रक कोकणाकडे रवाना
सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (३० जुलै) : यावर्षी राज्यात मान्सूनचा पाऊस विलंबाने पडला पण पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार कोसळलेल्या पावसाने सर्वत्र दाणादाण उडविली. राज्यातील काही भागात तर पावसाने हाहाकार माजविला. नद्या नाले तुडुंब भरल्याने पुराचे पाणी गावात शिरले. अनेक गावे पाण्याने वेढली गेली. तर काही गावे पाण्याखाली आली. नद्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचे संपर्क तुटले. कोसळधार पावसामुळे शहरातील वस्त्यांमध्येही पाणी शिरले. नदी नाल्यांप्रमाणे रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. शहरातील रस्ते जलमय झाले. शहरातील मुख्य रस्त्यांवर पूर आल्यागत पाणी वाहत होते. रस्त्यावरील पाण्याच्या ओढ्याने वाहने देखील वाहून गेल्याचे पाहायला मिळाले. धुवाधार कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीतच नाही तर अनेकांचे जीवनचं समाप्त झाले. धो धो बरसणाऱ्या पावसाने गावांनाच पूर आल्याने अनेक निष्पाप जीवांचे बळी गेले. तर अनेकांचे संसार उघड्यावर आले. आजही गावांभोवती पाण्याचा वेढा कायम आहे. राज्यातील अनेक ठिकाणी आभाळ फाटले, दरड कोसळली, घर कोसळले, संरक्षण भिंती घरांवर पडल्या, माणसे दबल्या गेली, अनेकांना जलसमाधी मिळाली, पालापाचोळ्याप्रमाणे जीवं वाहून गेली, काही तर गावच नाहीशी झाली, पावसाने रुद्रावतार धारण केल्याने पार होत्याच नव्हतं झालं. पुराचा सर्वात जास्त फटका बसला तो 'कोकण' भागाला. या भागात ठिकठिकाणी ढगफुटी झाल्याच्या घटना घडल्या. अनेक गावे पाण्याखाली आली. पूर्वपरीस्थीतीने जगण्याचे संदर्भच बदलले. अनेकांच्या उदर्निवाहाचे प्रश्न निर्माण झाले आहे. शासन सर्वोतपरी मदत करीतच आहे. पण अनेक राजकीय व सामाजिक पुढारीही मदती करिता सरसावले आहेत. काही ठिकाणच्या नागरिकांनी तर स्वतःहून पुरग्रस्तांच्या मदतीकरिता पुढाकार घेत अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य पूर पीडितांकरिता पाठविले आहे.वणी विधासभा क्षेत्रातूनही नेहमी संकटकाळात मदतीला धावणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कोकणातील पूर पीडितांकरिता अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य पाठविण्यात आले आहे. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी राज्यात उद्भवलेल्या पुरसंकटामुळे तेथील जनतेची उपासमार होऊ नये याकरिता वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेला अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्याची जमेल तेवढी मदत करण्याचे आव्हान केले होते. त्यांच्या पुढाकारातून आज ३० जुलैला अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंनी भरलेला ट्रक कोकणाकडे रवाना करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून हा ट्रक रवाना करण्यात आला. यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष राकेश खुराणा, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार वैभव जाधव व बरीच मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी राज्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती, त्यात उद्धवस्त झालेली संसारं व नैसर्गिक आपत्तीमुळे गेलेली जिवं याबाबत गजानन कासावार गुरुजींनी दुःखद संवेदना व्यक्त करत नागरिकांनी आपलं उत्तरदायित्व समजून अशा संकट काळात नेहमी सडळ हाताने मदत करावी असे सांगतानाच येथील जनतेने जी मदत दिली त्याबद्दल समाधान व्यक्त केले. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर हे नेहमी संकटात धावून आले आहेत. त्यांनी असेच नेहमी संकट काळात जनतेच्या पाठीशी उभे राहावे अशा भावना उपस्थितांमधून व्यक्त होत होत्या. अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंनी भरलेला ट्रक एसडीपीओ संजय पुज्जलवार यांनी हिरवी झेंडी दाखविल्या नंतर कोकणाकडे रवाना झाला.
मनसेची कोकणातील पुरग्रस्तांकरिता मोठी मदत, अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य भरलेला ट्रक कोकणाकडे रवाना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 30, 2021
Rating:
