हिरमोड: इयत्ता दहावीचा निकाल लागला, पण एकाही विद्यार्थ्यांने नाही पाहिला!


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मुंबई, (१७ जुलै) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा ऑनलाइन निकाल आज जाहीर केला खरा परंतु सर्व्हर क्रॅश झाल्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना हा निकाल पाहताच आला नसल्यामुळे त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

दहावीचा निकाल दुपारी १ वाजेनंतर दोन वेबसाईटवर उपलब्ध होईल आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका डाऊनलोड करता येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र,या दोन्ही वेबसाईट्स ओपनच होत नसल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबद्दल दिलगीरी व्यक्त केली असून या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

राज्य बोर्डाने आज दहावीचा निकाल जाहीर केला. सकाळी बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन विभागनिहाय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी जाहीर केली. दुपारी १ वाजेपासून हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येईल, असे बोर्डाने सांगितले होते. त्यासाठी http://result.mh-ssc.ac.in ,

http://mahahsscboard.in या दोन वेबसाईट्स देण्यात आल्या होत्या. पंरतु दुपारी १ वाजेनंतर दोन्ही वेबसाईट्सचे सर्व्हर क्रॅश झाले. तब्बल पाच-सहा तास उलटून गेले तरी अनेक विद्यार्थ्यांना निकालाच्या या वेबसाईट्सही ओपन होत नव्हत्या. राज्यभरातून तक्रारी गेल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या निकालाचे दोन्ही संकेतस्थळ लवकरच पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते. परंतु हे वृत्त लिहीपर्यंत म्हणजेच रात्री ७ वाजून ४७ मिनिटांपर्यंतही दहावीच्या निकालाच्या वेबसाईट्स ओपन होत नव्हत्या. त्यामुळे निकाल जाहीर होऊनही विद्यार्थी- पालकांना त्यांचे निकाल पाहता आले नसल्यामुळे त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या प्रकाराबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे. आज काही तांत्रिक बाबींमुळे शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर दहावीचा निकाल प्राप्त होण्यास अडथळे निर्माण झाले. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. सदर प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. घडल्याप्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

हिरमोड: इयत्ता दहावीचा निकाल लागला, पण एकाही विद्यार्थ्यांने नाही पाहिला! हिरमोड: इयत्ता दहावीचा निकाल लागला, पण एकाही विद्यार्थ्यांने नाही पाहिला! Reviewed by सह्याद्री चौफेर on July 17, 2021 Rating: 5
Powered by Blogger.