सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (२७ जुलै) : जिल्ह्यातील शेतकरी नापिकीने आर्थिक संकटात आहे. खरीप हंगामात शेतकर्यांची संपूर्ण मदार असते. शेतकर्यांना पीककर्ज मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तर, दुसरीकडे जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात पीककर्ज वाटपात घोळ झाला आहे. शेतकर्याच्या नावाने दुसर्याच व्यक्तीने बँक व्यवस्थापकाला हाताशी पकडून पीककर्जावर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
सुभाष राठोड, असे फसवणूक झालेल्या शेतकर्याचे नाव आहे. महागाव तालुक्यातील साई इजारा येथे शेती असून, गावातच त्यांचे वास्तव्य आहे. मात्र, त्या शेतकर्याच्या नावाने चक्क दिग्रस तालुक्यातील कलगाव येथील बँक ऑफ बडोदा शाखेतून कर्जाची उचल करण्यात आली. एक लाख १७ हजार रुपयांचे कर्ज डोक्यावर वाढल्याने शेतकरी हतबळ झाला आहे. खरीप हंगामात पीककर्ज मिळावे म्हणून सुभाष राठोड हे महागाव येथील युनियन बँक शाखेत १९ जुलै रोजी गेले. तेथे त्यांच्या नावावर दिग्रस तालुक्यातील कलगाव येथून पीककर्ज घेतल्याची बाब समोर आली. शेती महागाव तालुक्यात आणि कर्ज दिग्रस तालुक्यात हा प्रकार त्यांना धक्का देणारा ठरला. नेमका प्रकार काय, हे शोधण्यासाठी शेतकर्यांनी कलगाव येथील शाखा गाठली. तेथील बँक व्यवस्थापकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. शेतकर्याने माळहिवरा येथील व्यक्तीचे फोटो व कागदपत्रे दाखवा अशी वारंवार विनंती करूनही दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतकर्याने दिग्रस पोलिस ठाण्यात बँक व्यवस्थापकाविरुद्घ तक्रार दिली आहे. बोगस पीककर्ज वाटप करण्यासाठी रॅकेट सक्रीय असल्याचा संशय स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी व्यक्त केला.
यवतमाळ जिल्ह्यात पीककर्ज वाटपात घोळ
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 27, 2021
Rating:
