सह्याद्री न्यूज नेटवर्क |
नागपूर, २४ जुलै) : संत्रा नगरी उपराजधानीची क्राईम कॅपिटल अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. शहरात एका दिवसाआड खून होतच असतो. यामुळे पोलिसांसह शहराची महाराष्ट्रात चांगलीच बदनामी झाली. मात्र, येथील गुन्हेगारीवर पोलिसांना कोणतेही अंकुश आणता आलेले नाही. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अजनी परिसरात दोघांचा खून झाला. स्वयम नगराळे (वय २४) व शक्तिमान ऊर्फ शिवम् गुरुदेव (वय २४) अशी मृतांची नावे आहेत. यामुळे स्वतःला स्मार्ट म्हणवून घेणाऱ्या पोलिसांच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजनी परिसरातील कौशल्यानगरात असलेल्या जुगार अड्ड्यावरून स्वयम व शक्तिमान यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता,
यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाले होते. याच वादातून स्वयमचा गेम करण्याचा निर्णय शक्तीमानने घेतला. शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास शक्तिमान व त्याच्या तीन साथीदारांनी मिळून स्वयम नगराळे याचा धारदार शस्त्राने खून केला.
स्वयमचा मृत्यू झाल्याचे समजताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. खून झाल्याची माहिती मिळताच अजनी पोलिस, क्राईम ब्रांचने घटनास्थळ गाठून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर पोलिसांनी ऑपरेशन ऑल आउट (गुन्हेगारांचा शोध) राबविले. पोलिसांनी शक्तिमानच्या तिन्ही मित्रांना ताब्यात घेतले.
मात्र, शक्तिमान त्यांना मिळाला नाही. पोलिस त्याचा शोध घेत होते. यापूर्वीच स्वयमच्या मित्रांनी भांडे प्लॉटमधील शक्तीमानच्या मामाचे घर गाठून त्याला पकडले. त्याचे अपहरण करून जबरदस्ती आपल्या दुचाकीवर बसवले व स्वयमच्या ज्या ठिकाणी खून केला तेथे घेऊन गेले. स्वयमचा खून केल्यामुळे मित्रांनी शक्तिमानला मारहाण केली व नंतर त्याचाही खून केला.
नागपुरात खुनाची घटना आता काही नवीन राहिलेले नाही. रोजच खून होते, अशीच स्थिती शहरात निर्माण झाली आहे. मात्र, यावर पोलिसांचे कोणतेही अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगारीवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलेले नाही. स्वयमचा खून झाल्यानंतर पोलिस परिसरातच आरोपींचा शोध घेत होते. असे असतानाही स्वयमच्या मित्रांनी शक्तिमानला खून केलेल्या ठिकाणी नेऊन त्याचा खून केला. पोलिसांच्या नाकावर टिचून खून झाल्याने मोठे प्रश्न निर्माण होत आहे.
नागपुरात दुहेरी गेम : स्वयमच्या मित्रांनी शक्तिमानला खून केलेल्या ठिकाणी नेऊन त्याचा केला खून
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 24, 2021
Rating:
