वणी-वरोरा मार्गावरील तो मोठा खड्डा अद्यापही दुर्लक्षितच, वंचितच्या जिल्हा उपाध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले
सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (ता.१७) : वणी वरोरा या मुख्य मार्गावरील लोकमान्य टिळक महाविद्यालयाजवळ रस्त्याच्या मधोमध निर्माण झालेला मोठा खड्डा अद्यापही दुर्लक्षितच असून नगरपालिका प्रशासन हा खड्डा बुजविण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. मागील सात ते आठ महिन्यांपासून हा खड्डा बुजविण्याची ओरड होत असतांनाही नगरपालिकेने जाणीव पूर्वक याकडे दुर्लक्ष केले आहे. हा खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात कित्येक दुचाकीस्वार अनियंत्रित होऊन पडले असून त्यांना किरकोळ जख्माही झाल्या आहेत. समोर खड्डा दिसताच वाहन चालक अचानक ब्रेक करत असल्याने मागील वाहन समोरच्या वाहनाला धडकत असल्याच्याही कित्येक घटना या खड्यामुळे घडल्या आहेत. हा खड्डा बुजविण्या संदर्भात न्यूज माध्यमांनीही कित्येकदा वृत्त प्रकाशित केले आहे. पण नगरपालिकेच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे मुख्य मार्गावरील हा खड्डा अद्यापही बुजविण्यात आलेला नाही. या रस्त्याने नेहमी मार्गक्रमण करणाऱ्या नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना हा रस्त्याच्या मधोमध पडलेला खड्डा दिसू नये याचेच नवल वाटते. की, खड्डा दिसूनही ते आधंधळेपणाचे सोंग घेत आहे, हेच कळत नाही. रहदारीला अडथळा निर्माण करणारा व अपघाताला निमंत्रण देणारा हा खड्डा बुजविण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग यांनी नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी यांना सूचित करून नगरपालिकेचे या खड्याकडे लक्ष वेधले आहे. वणी वरोरा या प्रमुख रहदारीच्या मार्गावर लो.टी. महाविद्यालयाजवळ रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा तयार झाला आहे. या खड्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून हा खड्डा अपघाताचे कारण बनू लागला आहे. वणी वरोरा मार्गावर बाजोरिया लॉन पर्यंत दुभाजक असल्याने वरोऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर हा मोठा खड्डा पडला आहे. प्रमुख वस्त्यांकडे जाणारा हा मार्ग असून शाळा, महाविद्यालये, मंगलकार्यालये, लॉन, मंदिरं याच मार्गावर आहेत. हा मार्ग नेहमी रहदारीने गजबजलेला असतो. या मार्गावर वाहनांची नेहमी रेलचेल असते. या मार्गाने शाळा महाविद्यालयांमध्ये बरेच विद्यार्थी जाणे येणे करतात. हा खड्डा छोट्या वाहन धारकांसाठी धोकादायक ठरत असून हा खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात कित्येक किरकोळ अपघात झाले आहेत. मागील सात ते आठ महिन्यांपासून हा खड्डा बुजविण्याची नागरिकांमधून ओरड सुरु आहे. पण नगरपालिका प्रशासन याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. या खड्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग यांनी हा खड्डा बुजविण्यासंदर्भात नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी यांना सूचित करून नगर पालिकेला लेखी तक्रार दिली आहे.
वणी-वरोरा मार्गावरील तो मोठा खड्डा अद्यापही दुर्लक्षितच, वंचितच्या जिल्हा उपाध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 17, 2021
Rating:
