झरी तालुक्यातील वरपोड येथील महिलांना मारहाण करणाऱ्यांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा, क्रांतिवीर शामादादा कोलाम संघटनेची मागणी

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मारेगाव, (ता.२५) : मारेगाव वनपरीक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सोनेगाव शिवारात करण्यात आलेली वाघाची शिकार व पांढरकवडा वनविभागांतर्गत मुकुटबन वनपरिक्षेत्रातील मांगुर्ला शिवारात गर्भवती वाघिणीची निर्दयीपणे हत्या केल्याच्या आरोपाखाली आता पर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे.

 गर्भवती वाघिणीला धारदार शस्त्रांनी अमानुषपणे ठार करण्यात आले. अतिशय क्रूरपणे वाघिणीची हत्या करण्यात आल्याने समाजमन ढवळून निघाले होते. प्राणी मित्र संघटना आक्रमक झाल्या होत्या. या वाघिणीच्या हत्येची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली. शिकाऱ्यांचा शोध घेण्याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तपासाची सूत्रे देण्यात आली. जिल्हा पोलिस अधिक्षकांनी वणीचे एसडीपीओ यांना तपासाबाबत अलर्ट केल्याने काही दिवसांतच दोन शिकाऱ्यांना अटक करण्यात आली. नंतर उर्वरित शिकाऱ्यांचा तपास करण्याची जबाबदारी वनविभागावर सोपविण्यात आली.

वनविभागाने वाघिणीच्या हत्या प्रकरणातील पाच आरोपींचा दोन महिन्यानंतर शोध घेऊन पोलिसांच्या फौजफाट्यासह वरपोड येथून त्यांना अटक केली. या आरोपींना अटक करतांना वरपोड येथील महिलांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. महिला व मुलींना बेदम मारहाण करणाऱ्या वन संरक्षण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या नुसार कार्यवाही करण्याची मागणी क्रांतिवीर शामादादा कोलाम संघटनेच्या मारेगाव शाखेच्या वतीने मारेगाव तहसीलदारांमार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. महिलांवर लाठ्या उगारणाऱ्या वनसंरक्षण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

मारेगाव वनपरीक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सोनेगाव क्षेत्रातील आसन या उजाड शिवारातील नाल्याजवळ एका पट्टेदार वाघाचा गळ्याभोवती फास आवळलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. शिकारीच्या उद्देशाने लावण्यात आलेला फास गळ्यात अडकल्याने या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवून वनविभागाचा तपास सुरु होता.

ही घटना ताजी असतांनाच पांढरकवडा वनविभागांतर्गत येणाऱ्या मुकुटबन वनपरिक्षेत्रातील मांगुर्ला नियत क्षेत्रातल्या वनकक्ष क्रमांक ३० मध्ये एका गर्भवती वाघिणीची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली. अतिशय निर्दयीपणे शस्त्र खुपसून या वाघिणीला ठार मारण्यात आले. हत्या करणाऱ्यांनी तिचे दोन्ही पंजे व नखे कापून नेली. ही घटना २५ एप्रिलला उघडकीस आली. गर्भवती वाघिणीची हत्या करण्यात आल्याने प्राणी मित्रांमध्ये हळहळ व्यक्त केल्या गेली. तर वन्यजीवप्रेमी संघटनांनी वाघिणीची हत्या करणाऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी लावून धरली.

वाघिणीच्या या हत्येची राज्य स्तरावरही दखल घेतल्या गेली. वाघिणीच्या हत्येच्या तपासाची सूत्रे जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांच्या कडे देण्यात आली. जिल्हा पोलिस अधिक्षकांनी वणीचे एसडीपीओ संजय पुज्जलवार यांना अलर्ट करून घटनेचा तपास सुरु केला. आरोपींचा शोध घेण्याकरिता पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली. काही दिवसांतच पोलिसांनी आरोपींचा शोध लावून त्यांच्या मुसक्या आवळल्या. झरी तालुक्यातील पांढरवानी गावातील अशोक लेतु आत्राम व लेतु रामा आत्राम या बापलेकांना वाघिणीच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर वनविभागाकडे तपास सोपवून उर्वरित आरोपींना अटक करण्याची जबाबदारी देण्यात आली. वनविभागाने आरोपींचा शोध घेण्याकरिता दोन महिने लावले. दोन महिन्यानंतर १९ जूनला मारेगाव वनपरिक्षेत्रातील वाघाची शिकार व मुकुटबन वनपरिक्षेत्रातील वाघिणीची हत्या केल्याच्या आरोपाखाली ८ आरोपींना अटक करण्यात आली.

वनविभागाने पोलिसांचा फौजफाटा घेऊन झरी तालुक्यातील वरपोड गाठले. पहाटे ३ वाजता परिसराला घेराव घालून नागोराव भास्कर टेकाम, सोनू भवानी टेकाम, गोली रामा टेकाम, बोनू तुकाराम टेकाम व तुकाराम भवानी टेकाम या पाच आरोपीना वाघिणीच्या शिकार प्रकरणात अटक केले. नंतर वनविभाग व पोलिसांनी मोर्चा झरी तालुक्यातीलच येसापूर गावाकडे वळवत तेथून दौलत भिमा मडावी, मोतीराम भितु आत्राम व प्रभाकर महादेव मडावी या तिघांना वाघाच्या शिकार प्रकरणात अटक करण्यात आली. आरोपींना अटक करण्याकरिता जवळपास १५० वनसंरक्षण व पोलिस विभागाचा फौजफाटा दिमतीला होता.

 वरपोड येथील आरोपींना अटक करतेवेळी वनसंरक्षण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महिलांना अमानुषपणे मारहाण केल्याने महिला जख्मी झाल्या आहेत. बळाचा वापर करून महिला व मुलींवर लाठ्या उगारण्यात आल्या. यावेळी एका गर्भवती महिला व अल्पवयीन मुलीलाही मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. महिला व मुलींना झालेली मारहाण अतिशय निंदनीय असल्याच्या प्रतिक्रिया आता समाजातून उमटू लागल्या आहेत. आदिवासी कोलाम संघटनांनी महिलांना झालेल्या मारहाणीचा तीव्र निषेद करीत संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. सामाजिक स्तरातूनही महिलांना झालेल्या मारहाणीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

 क्रांतिवीर शामादादा कोलाम संघटना मारेगाव च्या वतीने महिला व मुलींना अमानुष मारहाण करणाऱ्या वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून संघटनेने ही मागणी केली आहे. संबंधितांवर कार्यवाही न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने निवेदनातून दिला आहे.
झरी तालुक्यातील वरपोड येथील महिलांना मारहाण करणाऱ्यांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा, क्रांतिवीर शामादादा कोलाम संघटनेची मागणी झरी तालुक्यातील वरपोड येथील महिलांना मारहाण करणाऱ्यांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा, क्रांतिवीर शामादादा कोलाम संघटनेची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on June 25, 2021 Rating: 5
Powered by Blogger.