प्रतिबंधित सुगंधित तंबाखाची तस्करी व विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक

                        (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.२४) : प्रतिबंधित सुगंधित तंबाखाची तस्करी व विक्री करणाऱ्या दोन आरोपींना डीबी पथकाने अटक केली आहे. शहरातील एका पानटपरीवर सुगंधित तंबाखाची अवैध विक्री करणाऱ्या व भालर रोडने सुगंधित तंबाखू इतरत्र विक्री करिता घेऊन जाणाऱ्या दुचाकी चालकासह पानटपरी चालकाला डीबी पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. डीबी पथकाने काल २३ जूनला दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून प्रतिबंधित सुगंधित तंबाखाची विक्री करणाऱ्या व सुगंधित तंबाखाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
डीबी पथक शहर व शहरालगतच्या परिसरात गस्त घालून मादक पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती गोळा करीत असतांना त्यांना जैन ले-आऊट येथील एक पानटपरी चालक मादक पदार्थाची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. डीबी पथकाने जैन ले-आऊट येथील पानटपरीवर धाड टाकली असता आरोपी मृणाल नवनाथ वेलेकर (३३) रा. जैन ले-आऊट हा प्रतिबंधित सुगंधित तंबाखाची विक्री करीत असतांना आढळून आला. पानटपरीची झडती घेतली असता तेथे सुगंधित तंबाखाचे ३५ डब्बे आढळून आले. पोलिसांनी आरोपी मृणाल वेलेकर याला अटक करून पानटपरीतून २५ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 
दुसऱ्या धाडीत वणी भालर रोडने मोपेड दुचाकीने अवैध विक्री करिता सुगंधित तंबाखू घेऊन जाणाऱ्या संतोष राजाराम वैद्य रा. भगतसिंग चौक याला पोलिसांनी अटक केली. वणी भालर रोडने दुचाकीने जात असलेला व्यक्ती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी दुचाकी थांबवून त्याची चौकशी केली असता तो सुगंधित तंबाखाची तस्करी करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याच्या जवळून २० सुगंधित तंबाखाचे डब्बे एकूण किंमत १५ हजार १०० रुपये, त्यातील दोन डब्यांचे सील फुटले असल्याने किंमत १४ हजार ७९० रुपये व मोपेड दुचाकी किंमत ५० हजार रुपये असा एकूण ६४ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी सुगंधित तंबाखावरील दोन्ही धाडीत एकंदरीत ९० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. डीबी पथकाच्या या कार्यवाहीने मादक पदार्थांची तस्करी करणारे व अवैध विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर अन्न सुरक्षा मानके कायदा २००६, नियम व नियमने २०११ च्या कलम २६(२)(i), २६(३)(e),२३ व सहवाचन कलम ३०(२)(a),५९, भादंविच्या कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डीबी पथक प्रमुख गोपाल जाधव, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे, सुनिल खंडागळे, हरिन्द्रकुमार भारती, पंकज उंबरकर, दिपक वान्ड्रूसवार यांनी केली.
प्रतिबंधित सुगंधित तंबाखाची तस्करी व विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक प्रतिबंधित सुगंधित तंबाखाची तस्करी व विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक Reviewed by सह्याद्री चौफेर on June 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.