सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (ता.२५) : वणी शहर व तालुक्यात मादक पदार्थांची सऱ्हास विक्री व तस्करी सुरु असल्याची माहिती डीबी पथकाला मिळाल्याने डीबी पथकाने मादक पदार्थ विकणाऱ्या व पुरविणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम सुरु केली आहे. सुगंधित तंबाखू व गुटख्याचा अनाधिकृतपणे साठा करून त्याची शहरात अवैध विक्री करणाऱ्यांवर डीबी पथकाने लक्ष केंद्रित केले आहे. तलबी वस्तूंच्या विक्री व तस्करीतून अमाप पैसा मिळत असल्याने प्रत्येक स्तरातील व्यक्ती या अवैध व्यवसायाशी जुडतांना दिसत आहे. झटपट मालदार होण्याच्या मोहाने अनेकांनी या अवैध धंद्यात उड्या घेतल्या आहे. दारू तस्करीला पर्याय म्हणून आता सुगंधित तंबाखाची तस्करी करण्याकडे कल वाढला आहे. दुचाकीने थोडाफार सुगंधित तंबाखाचा साठा आणून तो शहरातील पान सेंटर धारकांना चढ्या किमतीने विकल्या जात असल्याची कुणकुण पोलिसांना लागताच पोलिसही सतर्क झाले आहेत. दुचाकीवर पिशव्या व बोऱ्यांमध्ये भरून सुगंधित तंबाखाची वाहतूक करणाऱ्यांवर सहसा कुणाचा संशय जात नसल्याने त्यांचे चांगलेच फावत होते. पण त्यांची ही शक्कल पोलिसांच्या चांगलीच लक्षात आली आहे. काल २४ जूनला अवैध विक्री करिता सुगंधित तंबाखाचा साठा घेऊन जाणाऱ्या आणखी दोघा जणांना डीबी पथकाने अटक केली आहे. वणी यवतमाळ रोडवरील निंबाळा गावाजवळ दुचाकीने सुगंधित तंबाखू घेऊन जाणाऱ्या या दोन तस्करांना अटक करण्यात आली.
डीबी पथकाने सध्या मादक पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम हाती घेतले आहे. सुगंधित तंबाखू व गुटख्याची विक्री व तस्करी करणाऱ्यांच्या मागावर सध्या डीबी पथक आहे. शहर व परिसरात गस्त घालून सुगंधित तंबाखाची अवैध विक्री व तस्करी करणाऱ्यांची पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे.
शहरात गस्त घालत असतांना डीबी पथकाला वणी यवतमाळ रोडने सुगंधित तंबाखाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. डीबी पथकाने यवतमाळ रोडवर गस्त घातली असता मोपेड दुचाकीने दोन इसम पांढऱ्या रंगाच्या बोरीत सामान घेऊन येतांना दिसले. पोलिसांना या दोघांवर संशय आल्याने पोलिसांनी दुचाकी थांबवून त्यांची चौकशी केली. तसेच बोरीतील सामानाची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखाचे ४० डब्बे आढळले.
पोलिसांनी सुगंधित तंबाखाची तस्करी करणाऱ्या कमर अली दौलत अली (३८) रा. आंबेडकर वार्ड मारेगाव व विक्रांत भास्करराव सुत्रावे (४८) रा. रंगारीपुरा या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून सुगंधित तंबाखाचे २०० ग्राम वजनाचे ४० डब्बे किंमत २९ हजार ४३५ रुपये व दुचाकी किंमत ५० हजार रुपये असा एकूण ७९ हजार ४३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील एक जण शहरातील बुक स्टाल व्यावसायिक आहे.
कोरोनामुळे शाळा महाविद्यालये बंद असल्याने वह्या, पुस्तके व अन्य शालेयउपयोगी वस्तूंची विक्रीच ठप्प झाली आहे. त्यामुळे स्टेशनरी व्यवसायिकांची आर्थिक स्थिती दयनीय झाली असून उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांची अवैध धांड्यांकडे पाऊले वळू लागली आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ व भादंवि च्या कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डीबी पथक प्रमुख गोपाल जाधव, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे, सुनिल खंडागळे, हरिन्द्रकुमार भारती, पंकज उंबरकर, दिपक वान्ड्रूसवार यांनी केली.
सुगंधित तंबाखाची तस्करी करणाऱ्या आणखी दोन तस्करांना डीबी पथकाने केली अटक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 25, 2021
Rating:
