टॉप बातम्या

शेतकरी, शेतमजुरांचे सोयीच्या वेळेत कोरोना लसीकरण व्हावे साहेबराव पवार यांची मागणी


सह्याद्री न्यूज | राजविलास 
यवतमाळ, (ता.१५) : सध्या आरोग्य विभागातर्फे सर्वत्र कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. साधारणतः सकाळी १० नंतर हि प्रक्रिया सुरु होते. मात्र हा पेरणीचा काळ असल्यामुळे सकाळी ७ नंतर जवळपास सगळेच शेतकरी व शेतमजूर शेतामध्ये असतात. त्यामुळे अनेकजण लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना सोयीच्या वेळेत लसीकरण केले जावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव पवार यांनी केली आहे. 

लस घेतल्यानंतर काही काळ आरामही गरजेचं असतो. त्यामुळे योग्यवेळी लसीकरण झाल्यास ग्रामस्थांना नियोजन करणे सोपे जाईल. पेरणीचा हंगाम हा लगबगीचा काळ असतो. या दिवसांमध्ये शेतकऱ्यांचा वेळ अत्यंत मोलाचा असल्याने शेतीची मशागत, बियाणे व खतांची जुळवाजुळव, पेरणी, मजुरांची उपलब्धता याकडे शेतकऱ्यांचे सर्वाधिक लक्ष असते. 

त्यामुळे सकाळी ७ ते १० व सायंकाळी ५ ते ८ या वेळेत ग्रामीण भागामध्ये लसीकरण केले गेल्यास ग्रामस्थांचा अधिक प्रतिसाद मिळेल अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली. तसेच ग्रामीण भागामध्ये कोरोना व लसीकरण याबाबत प्रचंड गैरसमज आहेत. समाजमाध्यमातून झालेल्या चुकीच्या प्रचारामुळे अनेक अफवा गेल्या काही काळात पसरल्या आहेत. त्याबाबत जनजागृती करणे देखील तितकेच आवश्यक आहे. केवळ आरोग्य कर्मचारीच नव्हे तर जनतेशी थेट संपर्क येणारे ग्रामसेवक, तलाठी व शिक्षक अशा शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील जनतेपर्यंत योग्य माहिती पुरविणे आवश्यक आहे अशी अपेक्षा साहेबराव पवार यांनी व्यक्त केली.

पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर हि मोहीम राबविणे गरजेचे आहे. जेणेकरून प्रत्येक नागरिकाचे लसीकरण होईल. संभाव्य तिसरी लाट येऊ नये यासाठी लसीकरण मोहीम अधिक व्यापक करून इतर समाजघटकांनाही यामध्ये सामील करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.
Previous Post Next Post