ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याकरिता भाजपचे चक्काजाम आंदोलन

सह्याद्री न्यूज : प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.२६) : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीला घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज संविधान चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ओबीसी समाजाचे आरक्षण परत घेऊनच राहू अशी ठाम भूमिका आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह भाजपच्या नेते मंडळींनी घेतली. यावेळी भाजपच्या नेते मंडळी व पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 
महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण हिरावल्या गेल्याचे भाजपचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयात राजकीय आरक्षणाचा मुद्दा लावून धरण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही भाजपने केला आहे. भाजपने ओबीसींसाठी वेगळं खातं तयार केलं. मग या आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहेत, असा प्रश्नही यावेळी भाजप नेत्यांनी उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीय आयोग स्थापन करून ओबीसींचा इम्पेरिकल डाटा सादर करण्यास सांगितले. पण महाविकास आघाडी सरकारने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षणच रद्द केले आहे. ओबीसींना जोपर्यन्त पूर्ववत राजकीय आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत भाजचा लढा सुरूच राहणार असल्याचे यावेळी भाजप नेत्यांनी स्पष्ट केले. आंदोलनात मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनेही दिली. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी रुग्णवाहिका व मालवाहू वाहने जाता यावी व वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरिता सामंजस्यातून एकेरी वाहतूक सुरु केली. 
आंदोलनात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, संजय पिंपळशेंडे, श्रीकांत पोटदुखे, गजानन विधाते, व आवारी, शुभम इंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याकरिता भाजपचे चक्काजाम आंदोलन ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याकरिता भाजपचे चक्काजाम आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on June 26, 2021 Rating: 5
Powered by Blogger.