विठ्ठलवाडी येथील प्रमुख रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचे काम थांबले, रस्ता अद्यापही डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत !
सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (ता.२९) : विठ्ठलवाडी परिसरातून एस बी लॉन मार्गे वणी वरोरा रोडला जोडला जाणारा प्रमुख रस्ता अद्यापही डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत आहे. मागील दिड वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरु आहे. अतिशय संत गतीने या रस्त्याचे काम करण्यात आले.खडीकरणाला वर्षभर लागले, आता डांबर पडायला पुढील वर्ष उजाडते की, काय असे वाटू लागले आहे. खनिज विकास निधी अंतर्गत या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचे काम हाती घेण्यात आले. पण आता निधी अभावी या रस्त्याचे काम रखडले असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे.
या रस्त्यावर आता ठिकठिकाणी पाणी साचत असून रस्त्यावर पडलेले गिट्टीचे ढिगारे वाहतुकीला अडथळे निर्माण करीत आहे. खडीकरण करण्यात आलेली गिट्टीही उखडू लागली असून रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर आता डांबर केंव्हा पडते, ही प्रतिक्षा येथील नागरिकांना लागली आहे.
विठ्ठलवाडी परिसरातून मुख्य मार्गाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्याच्या दुरुस्तीचे काम २०२० च्या एप्रिल, मे महिन्या पासून सुरु आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाची निविदा बांधकाम विभागाकडून काढण्यात आली. अगदीच बरसादीच्या तोंडावर हा रस्ता खोदण्यात आला. पावसाळ्याचे चार महिने हा रस्ता निव्वळ खोदून राहिला. परिसरातील नागरिकांचे या रस्त्याने जाणे येणे कठीण झाले. नागरिकांच्या घरासमोर पाण्याचे खळगे तयार झाले. रस्त्यालगत घरे असणाऱ्यांचे तर घराबाहेर पडणे कठीण झाले होते.
हिवाळ्यानंतर या रस्त्याच्या खडीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. खडीकरणाचे कामही अत्यंत संत गतीने चालले. परंतु आता पर्यंत या रस्त्यावर डांबर पडले नाही. दुसरा पावसाळा सुरु झाला पण अजूनही या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. आता पावसाचे पाणी या रस्त्यावर साचून राहते. पाऊस पडला की, या रस्त्याने मार्गक्रमण करणेच कठीण होऊन बसते. गिट्टीचे ढिगारे अद्यापही रस्त्यावर पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. खनिज विकास निधी अंतर्गत धडाक्यात या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले. पण तडाक्यात हे काम पूर्ण करण्यात आले नाही. दिवाळी पासून निधी मिळालाच नसल्याने काम थांबविण्यात आल्याचे सांगण्यात येते. आता हे रखडलेले काम केंव्हा पूर्ण होते, याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.
विठ्ठलवाडी वासियांचा संयम नेहमी कायम राहिला आहे, त्यामुळे येथील नागरिकांनी तक्रारी करण्याचे टाळले. पण आता कालावधी जास्तच होत असल्याची कुजबुज येथील नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. या रस्त्याचे दुरुस्तीकरणाचे काम मागील दिड वर्षांपासून सुरु आहे. आता तर डांबराच्या किमतीही वाढल्या असल्याने कंत्राटदार चिंतेत आले आहे. वेळेवर निधी न मिळाल्याने काम रखडल्या गेले. त्यावेळेस ज्या रेट मध्ये काम घेतले, तेंव्हा डांबराच्या किमती कमी होत्या. आता डांबराच्या किमती वाढल्याने कंत्राटदाराला आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असल्याचेही बोलल्या जात आहे.
त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण होण्याला आता किती कालावधी लागतो, कुणास ठाऊक. पण रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचे काम अर्ध्यावर थांबल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
विठ्ठलवाडी येथील प्रमुख रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचे काम थांबले, रस्ता अद्यापही डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 29, 2021
Rating:
